
5 तासांपूर्वी
नाशिक : अपघाती मृत्यू कमी करण्यासाठी एकीकडे शहराचे पोलिस आयुक्त दीपक पांडे यांच्याकडून हेल्मेट सक्तीवर जोर दिला जातो आहे. दुसरीकडे शहरात गुन्हेगारीचा आलेख उंचावत चालला आहे. गेल्या चार दिवसांत खुनाच्या तीन घटना घडल्या असून, महिन्याभरात चार खून झाले आहेत. याशिवाय चेन स्नॅचिंगच्या घटनांसह दुचाकी चोरी व अन्य गुन्हेगारीत वाढ झालेली आहे. खून सत्राने हादरलेल्या नाशिककरांमध्ये भितीचे वातावरण निर्माण झालेले आहे. त्यामुळे शहरात पोलिसांचा वचक कमी झाल्याचे भावना नाशिककरांमध्ये तयार झाली आहे.
हेल्मेट सक्तीसाठी ‘नो हेल्मेट, नो पेट्रोल’ चा नारा देताना अंमलबजावणीसाठी पोलिस कर्मचाऱ्यांना पंपांवर तैनात केले आहे. सामान्य नागरीकांना हेल्मेट सक्तीपासून अन्य विविध पातळ्यांवर नियमांची जाणीव करून दिली जात आहे. मात्र, दुसरीकडे शहरात गुन्हेगारांवर पोलिसांचा वचक नसल्याची स्थिती आहे. खून सत्रांमध्ये वाढ झाली आहे. नोव्हेंबर महिन्याच्या पहिल्याच आठवड्यात गंगापूर रोडवरील संत कबीरनगर झोपडपट्टीत पॅरोलवर आलेल्या संशयिताने एका महिला पदाधिकाऱ्याचा धारदार शस्त्राने वार करत खून केला. मात्र, त्यानंतर मागील दिवसात म्हसरुळ येथील सराईत प्रवीण कातड याचा खून करण्यात आला. दोन खुनाचे सत्र थांबत नाही तोच पंचवटी येथील भाजीपाला व्यावसायिक राजेश शिंदे यांचादेखील खून करण्यात आला. त्यानंतर शुक्रवारी (ता.२६) सकाळी सातपूर येथील भाजप पदाधिकारी अमोल ईघे यांचादेखील भल्या पहाटे खून करण्यात आला. शहरात मागील काही दिवसात चार खुनाच्या घटना घडल्यानंतर उपनगरांमध्ये चेन स्नॅचिंगच्या घटनांमध्येही वाढ झालेली आहे. दुचाकी व घरफोडी सत्रदेखील सुरुच आहे. त्यामुळे शहरात पोलिसांचा वचक राहिला का नाही, असा प्रश्न आता उपस्थित होवू लागला आहे.
हेही वाचा: नाशिक हादरलं, भाजपा मंडळ अध्यक्षाची निघृण हत्या
उपक्रम बंद की सुरु ?
शहरातील गुन्हेगारी आटोक्यात आणण्याच्या उद्देशाने माजी पोलिस आयुक्त यांच्याकडून अनेक उपक्रम राबविण्यात आले. यात झोपडपट्टीमध्ये ऑलआऊट, कोम्बिंग ऑपरेशन राबवीत गुन्हेगारीवर वचक ठेवला तर पोलिस रस्त्यावर दिसला पाहिजे या हेतूने पोलिस ठाण्यात विभागनिहाय पेट्रोलिंगसाठी क्यू आर कोड ही प्रणाली सुरु करण्यात आली होती. यामुळे पोलिस रस्त्यावर दिसत असल्याने गुन्हेगारीवर वचक बसला होता. मात्र आता सर्व उपक्रम बंदच आहे असे वाटू लागले आहे.
Esakal