ऐश्वर्या खरे

ग्लॅम-फूड : ‘पुलाव ही माझी खास रेसिपी’

sakal_logo

द्वारे

सकाळ वृत्तसेवा

– ऐश्वर्या खरे

माझा आवडता पदार्थ म्हणजे वरण-भात आणि भेंडीची भाजी. ते माझे कम्फर्ट फूड आहे. माझी आई सगळ्यात चविष्ट अशी भेंडीची भाजी बनवते, त्यामुळे तीच माझी आवडती आहे. वरण-भात तर माझा फेव्हरेट आहे. मला तो खूप आवडतो. दररोज खाल्ला तरी मला कधीच कंटाळा येत नाही. मी लखनौला गेले होते, त्या वेळी तिकडे खाल्लेले कबाब मी कधीच विसरू शकणार नाही. त्याची चवही अप्रतिम होती. चित्रीकरण व फिरण्यासाठी मी जेव्हा-जेव्हा दुसऱ्या ठिकाणी जाते, त्या वेळी तेथील स्पेशल डिश मी नक्कीच ट्राय करते. कारण, प्रत्येक भागातील पदार्थांची चव वेगळी अन् अनोखी असते.

सध्या मी झी टीव्हीवर ‘भाग्यलक्ष्मी’ या मालिकेत लक्ष्मीची मुख्य भूमिका साकारत आहे, त्यामुळे माझं शेड्यूल्ड खूप बिझी असतं. मला स्वतःलाही फारसा वेळ देता येत नाही. मला स्वयंपाक करायलाही फारसं आवडत नाही; पण मी माझ्यापुरतं जेवण बनवू शकते. माझ्या घरात माझ्या हातचा पुलाव सर्वांचा आवडता आहे. तो बनवायला अतिशय सोपा आहे आणि पटकन बनतो. विशेष म्हणजे सर्वजण त्याचा मनसोक्त आस्वाद घेतात. त्यामुळे मला खूप आनंद होतो.

मी मागे एकदा व्हाइट सॉस पास्ता बनवण्याचा प्रयत्न केला होता आणि माझ्या एका मैत्रिणीने त्यात केचप घातले आणि मग तो पिंक सॉस पास्ता बनला. हा पदार्थ माझ्याकडून बिघडला गेला; पण पुन्हा एकदा ट्राय केल्याने तो मात्र चांगला जमला. खरेतर मला कारले अजिबात आवडत नाही. त्याची चव कडसर असल्याने मला ते आवडत नसावे; पण अनेकजण ते मोठ्या आवडीने खातात. माझ्या आईच्या हातचे मेथी मलाई मटर खूप आवडते. ती ते कसे बनवते हे मला आजही माहिती नाही. मला वाटते, केवळ आईच्या हातच्या स्वादामुळे तो पदार्थ खास बनतो. आईने बनविलेले इतरही अनेक पदार्थ मला खूप आवडतात. तिच्या हातच्या स्वयंपाकाला वेगळीच चव असते. त्यामुळे सर्वजण नेहमीच तिचे कौतुक करतात.

(शब्दांकन : अरुण सुर्वे)Esakal

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here