
5 तासांपूर्वी
बदलापूर : लोकसंख्या नियंत्रणासाठी शासकीय आरोग्य केंद्रात सरकारकडून मोफत कुटुंब नियोजन शस्त्रक्रिया केल्या जातात; मात्र बदलापूर गावातील प्राथमिक आरोग्य केंद्रात या शस्त्रक्रियेसाठी नागरिकांकडून प्रत्येकी दोन हजारांची मागणी केली जात असल्याचे उघड झाले आहे.
बदलापूर गावात जिल्हा परिषदेअंतर्गत प्राथमिक आरोग्य केंद्र आहे. या केंद्रात सर्व आरोग्य सुविधा मोफत उपलब्ध केल्या जातात; मात्र याच आरोग्य केंद्रात सिझेरियन झालेल्या महिलांच्या कुटुंब नियोजन शस्त्रक्रियेसाठी दोन हजार रुपयांची मागणी होत असल्याचे समोर आले.
बदलापूर पश्चिम मोहनांनद नगर परिसरातील एक महिला सोमवारी (ता. २२) कुटुंब नियोजन शस्त्रक्रियेसाठी आरोग्य केंद्रात गेली होती. तेथील आशा सेविकांनी या महिलेकडे दोन हजार रुपयांची मागणी केली. डॉक्टरांना हे पैसे द्यावे लागत असल्याचे आशा सेविकांनी महिलेस सांगितले. आरोग्य सहायकानेही पैसे भरावे लागतील, असा तगादा लावला; मात्र महिलेने पैसे भरल्याची पोचपावती मागितली असता, त्यास नकार देण्यात आला. तसेच शस्त्रक्रियेसाठी भरलेला अर्जही कर्मचाऱ्यांनी वरिष्ठांच्या सांगण्यावरून परत घेतला आणि तिला मोफत शस्त्रक्रियेसाठी उल्हासनगर येथे जाण्यास सांगितले.
‘डॉक्टर सांगतात…’
याबाबत आशा सेविकांना विचारणा केली असता, आम्ही येथील डॉक्टरांच्या सांगण्यानुसार पैसे मागतो, असे उत्तर दिले. व्यवस्थापक म्हणून काम पाहणाऱ्या डॉ. प्रशांत कनोजा यांनी पैशांच्या व्यवहाराबद्दल कल्पना नसल्याचे सांगत जबाबदारी झटकली.
अशा प्रकारची शस्त्रक्रिया करण्यासाठी पैसे आकारले जात नाहीत. पैसे मागितले असल्यास त्याबाबत चौकशी करून दोषींवर कारवाई केली जाईल.
– मनीष रेंगे, आरोग्य अधिकारी, जिल्हा परिषद, ठाणे
Esakal