
5 तासांपूर्वी
निपाणी : कोरोनाच्या जागतिक महामारीनंतर जगाचे चित्र कोरोनापूर्व आणि कोरोनोत्तर असे झाले आहे. कोरोनाच्या लाटेने जग हादरवून टाकले. या काळात निपाणी तालुक्यातील वैद्यकीय क्षेत्रात मात्र वेगवान घडामोडी घडल्या. त्यापैकीच एक महत्त्वाची म्हणजे गेल्या दीड वर्षात औषधांच्या दुकानांची संख्या २० टक्के म्हणजे तब्बल ६० इतकी वाढली आहे. महिन्याला ४ ते ५ नवीन मेडिकल स्टोअर्स तालुक्यात सुरू झाली आहेत. सध्या निपाणी तालुक्यात मेडिकल स्टोअर्सची संख्या २५० च्या पुढे सरकली आहे. बेरोजगारीवर उपाय म्हणून तरुण या व्यवसायाकडे वळू लागल्याचे चित्र आहे.
औषध प्रशासन विभागाकडून प्राप्त झालेली माहिती थक्क करायला लावणारी आहे. या विभागातील अधिकारी व जाणकारांनी केलेल्या निरीक्षणानुसार कोरोना काळात जगातील व्यवस्था गडगडली. मात्र वैद्यकीय क्षेत्रात मोठ्या उलाढाली झाल्या. अत्यावश्यक सेवा म्हणून औषध दुकाने २४ तास सुरू राहिली. या क्षेत्रात करिअरच्या उत्तम संधी आहेत, हे त्यातून स्पष्ट झाले. गेल्या काही काळात डी. फार्मसी आणि बी. फार्मसी या अभ्यासक्रमासाठी प्रवेश घेणाऱ्या आणि यशस्वी होणाऱ्या विद्यार्थ्यांची संख्या झपाट्याने वाढली. या तरुणांनी एखाद्या कंपनीत नोकरी करावी तर त्या संधी कोरोना संकटाने हिरावून घेतल्या किंवा कमी केल्या.
अशावेळी स्वतःचे नवीन मेडीकल उघडणे, हा पर्याय तरूणाईसमोर होता. त्यांनी तो निवडल्याचे आकडेवारीतून समोर येते. शहरी भागात तर गल्लीबोळात मेडिकल स्टोअर्स दिसत आहेत. या यादीत काही जेनेरिक मेडिकल शॉपचाही समावेश आहे. गेल्या वर्षभरात त्यांची संख्या झपाट्याने वाढू लागली आहे. आधी शहरात त्यांनी संधी शोधली आणि मोठ्या गावांतही ते पोहचू लागले आहेत. काही ठिकाणी नवीन पात्र उमेदवारांचा परवाना घेऊन आपल्या शॉपचा विस्तार करण्याचा झपाटाही वाढला आहे
जेनेरिक औषधाचा वाढला खप
औषधांच्या भरसमाट किंमतीमुळे मेटाकुटीस आलेल्या रुग्णांना आता जेनेरिक औषधाचा पर्याय सापडला आहे. रुग्णांच्या आग्रहामुळे डॉक्टरांनी ब्रँडेड कंपन्याऐवजी केवळ औषधांचे कंटेट लिहिण्यास सुरूवात केली आहे. कंपन्यापेक्षा सुमारे ५० टक्के कमी किंमतीत मिळत असल्याने जेनेरिक औषधांची उलाढाल कमालीची वाढली आहे. जेनेरिक औषधे स्वस्त आहेत म्हणून नाही तर त्याचे परिणामही चांगले असल्याने खप वाढल्याचे विक्रेते सांगतात.
‘कोविडच्या काळात मेडिकल व्यवसायाची क्रेझ मोठ्या प्रमाणात वाढली. तब्बल ६० हून अधिक स्टोअर्स निपाणी तालुक्यात गत दीड वर्षात वाढली आहेत. तरुणांना हा व्यवसाय खुणावत असला तरी आता तीव्र स्पर्धा आली आहे. टोकाच्या स्पर्धेमुळे नफा मिळविणे अवघड बनले आहे.’
-इवॉन इमॅनुल,
अध्यक्ष, निपाणी तालुका मेडिकल असोसिएशन
Esakal