आचारसंहिता संपणार; जिल्‍हा परिषद गजबजणार
sakal_logo

द्वारे

सकाळ वृत्तसेवा

कोल्‍हापूर : विधान परिषद निवडणूक बिनविरोध झाल्याने आचारसंहिता संपुष्‍टात येणार आहे. त्यामुळे पुन्‍हा एकदा मिनी मंत्रालय अर्थात जिल्‍हा परिषद सोमवार (ता. २९)पासून गजबजेल. जिल्‍हा परिषद मतदारसंघाच्या पुनर्रचनेचे काम सुरू आहे. त्यामुळे साधारण जानेवारीत ही निवडणूक होण्याची शक्यता आहे. परिणामी, मंजूर विकासकामे मार्गी लावण्यासाठी सदस्यांची घाई सुरू आहे. सोमवारपासून बैठकांचा धडाका सुरू होणार असून, याबाबत आजच मुख्य कार्यकारी अधिकारी संजयसिंह चव्‍हाण यांनी खातेप्रमुखांची बैठक घेत सूचना दिल्या.

जिल्‍हा नियोजन मंडळाची बैठक पार पडल्यानंतर सर्वसाधारण सभा घेवून विविध विकासकामांना मंजुरी देण्याचे पदाधिकारी व सदस्यांनी नियोजन केले होते. मात्र, अचानकच विधानपरिषद निवडणुकीची आचारसंहिता जाहीर झाली आणि सभा रद्द करण्याचा निर्णय घेण्यात आला. सभा रद्द करण्यावरून सदस्य वि‍रूद्ध प्रशासन असा वादही झाला. विधानपरिषद निवडणुकीत गोंधळ होवू नये म्‍हणून मतदारांना सहलीवर पाठवण्यात आले. यामध्ये जिल्‍हा परिषदेच्या बहुतांश सदस्यांचा समावेश होता. मात्र, शुक्रवारी अचानकच ही निवडणूक बिनविरोधी पार पडली. त्यामुळे बहुतांश सदस्य सहलीवरून परतीच्या प्रवासाला लागले आहेत.

निवडणूक बिनविरोध झाल्याने उचलही थांबली आहे. त्यामुळे जिल्‍हा परिषदेच्या कामांसाठी आणि खासकरुन टेंडरसाठी झुंबड उठणार आहे. या काळात अधिकाऱ्यांकडून सहकार्य मिळाले नाहीतर मात्र संघर्ष अटळ आहे.Esakal

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here