शेअर मार्केट
sakal_logo

द्वारे

सकाळ वृत्तसेवा

मुंबई : भारतीय शेअर बाजारात आज सुमारे तीन टक्क्यांनी पडझड झाल्याने गुंतवणूकदारांनी ‘ब्लॅक फ्रायडे’ अनुभवला. दक्षिण आफ्रिका आणि जर्मनीमध्ये कोरोनाने धुमाकूळ घातल्याच्या वृत्तामुळे आज जगभरातील सर्वच शेअर बाजारांमध्ये घबराट पसरली. त्याचा नकारात्मक परिणाम म्हणून सेन्सेक्सने १,६७८.९४ अंशांनी, तर निफ्टीने ५०९.८० अंशांनी गटांगळी खाली. या घसरणीमुळे आज गुंतवणूकदारांचे सात लाख कोटी रुपयांचे नुकसान झाले.

आज दिवसअखेरीस सेन्सेक्स ५७,१०७.१५ अंशांवर, तर निफ्टी १७,०२६.४५ अंशांवर स्थिरावला. या आठवड्यातील ही दुसरी मोठी आपटी असून सोमवारीही सेन्सेक्स १,१७० अंशांनी पडला होता. १९ ऑक्टोबरला सेन्सेक्सने ६२,२४५ चा सर्वकालिक उच्चांक नोंदविल्यापासून तेथून आतापर्यंत त्याची सुमारे आठ ते नऊ टक्के घसरण झाली आहे. त्यामुळे गुंतवणूकदारांच्या मालमत्तेचे मूल्य आतापर्यंत १६ लाख कोटी रुपयांनी घसरले आहे. तेव्हा हे मूल्य २७४ लाख कोटी रुपये होते, तर आज ते २५८ लाख कोटी रुपयांवर आले.

बँकिंग शेअरमध्ये घसरण

आजची घसरण एवढी खोलवर होती की, निफ्टीच्या ५० प्रमुख शेअरपैकी फक्त सिप्ला, डॉ. रेड्डीज लॅब, डीव्हीज लॅब (१४० रु. वाढ) व नेस्ले हे चारच शेअर वाढ दाखवीत बंद झाले; तर सेन्सेक्सच्या प्रमुख ३० शेअरपैकी फक्त डॉ. रेड्डीज लॅब १५२ रुपयांनी (बंद भाव ४,७४४ रु.) वाढला, नेस्ले २२ रुपयांनी (१९,२१०) वाढला. एशियन पेंट २० पैशांनी (३,१४३), तर टीसीएस १५ पैशांनी (३,४४५) वाढला. उरलेले सर्व शेअर तोटा दाखवीत बंद झाले. तर इंडसइंड बँकेचे शेअर घसरून ९०१ रुपयांवर, मारुती ७,१७० रुपयांवर बंद झाला. टाटा स्टील ६१ रुपयांनी घसरला, बजाज फायनान्स ३२७ रुपयांनी आणि बजाज फिनसर्व्ह ६७४ रुपयांनी घसरला. एचडीएफसी १२८ रुपयांनी, टायटन १०६ रुपयांनी कोलमडला. रिलायन्स इंडस्ट्रीज आज ८२ रुपयांनी कमी झाला तर लार्सन अँड टुब्रो ७१ रुपयांनी घसरला.

तिसरी गटांगळी

कोरोनाच्या फैलावामुळे जर्मनीत लॉकडाऊन लावण्यात आला, तर दक्षिण आफ्रिकेतून येणाऱ्या विमानांवर युरोपात बंदी आली. या जागतिक नकारात्मक वातावरणामुळे आज आशियातील जपान, हाँगकाँगसह बहुतेक शेअरबाजार दीड ते अडीच टक्के पडले होते. जागतिक चलनवाढीची भीती, कच्चे तेल व धातूंची दरवाढ या कारणांचीही भर पडल्याने परदेशी संस्थात्मक गुंतवणूकदार गेले काही दिवस भारतीय शेअरबाजारात सातत्याने विक्री करीत आहेत. भारतीय शेअर बाजारांची या वर्षातील ही तिसरी मोठी गटांगळी आहे.Esakal

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here