
‘कॉंग्रेस ही एक विचारधारा आहे. देशाला कॉंग्रेसचे विचारच पुढे नेऊ शकतात.’
5 तासांपूर्वी
कुडाळ (सातारा) : देशाला महागाईच्या खाईत लोटून, तसेच शेतकरी विरोधी धोरणे राबवून शेतकऱ्यांना देशोधडीला लावणाऱ्या भाजप सरकारचा (BJP Government) आगामी निवडणुकीत जनता कडेलोट करेल, असे प्रतिपादन काँग्रेसचे (Congress) जिल्हा निरीक्षक श्रीरंग चव्हाण यांनी केले.
येथे संविधान दिवस व जिल्हा काँग्रेस समितीच्या वतीने सभासद नोंदणी प्रारंभप्रसंगी आयोजित कार्यक्रमात चव्हाण बोलत होते. प्रारंभी २६/११ च्या हल्ल्यात हुतात्मा झालेल्या पोलिस निरीक्षक तुकाराम ओंबळे यांना श्रद्धांजली वाहण्यात आली. या वेळी जिल्हा काँग्रेसचे अध्यक्ष सोपानराव म्हस्के, प्रदेश प्रतिनिधी डॉ. सुरेश जाधव, सरचिटणीस बाबूराव शिंदे, नरेश देसाई, ॲड. दत्तात्रय धनावडे, तालुकाध्यक्ष विक्रम तरडे, संदीप माने, प्रकाश परामणे, जिजाबा निकम, शिवाजीराव गायकवाड, अमृतराव शिंदे, तानाजी रांजणे, बाबासाहेब साळेकर, अजय नलावडे, संदीप गोळे, अमोल शिंदे उपस्थित होते.
हेही वाचा: ‘बंटी पाटलांनी जवळीकता इतकी वाढवली, की भाजपलाही पत्ता लागला नाही’
निरीक्षक चव्हाण म्हणाले, ‘‘कॉँग्रेस ही एक विचारधारा आहे. देशाला कॉँग्रेसचे विचारच पुढे नेऊ शकतात. निवडणुकीत आघाडी केल्याने कार्यकर्त्यांवर अन्याय होत आहे, तसेच पक्षाचेही नुकसान होते. स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका काँग्रेस स्वबळावर लढणार आहे. कॉँग्रेसची विचारधाराच पक्षाला पुन्हा गतवैभव प्राप्त करून देईल. जे सध्या कॉँग्रेसमध्ये आहेत तेच खरे मावळे आहेत. शेतकऱ्यांवर अन्याय करणारे कायदे रद्द करण्यात आले हे कॉँग्रेसचे यश आहे.’’
हेही वाचा: साताऱ्याचा बालेकिल्ला पोखरला जातोय?
श्री. म्हस्के म्हणाले, ‘‘शेतकरी दीड वर्षे आंदोलन करत आहेत; पण पंतप्रधान त्यांना भेटायला गेले नाहीत. अखेर सरकारला कायदे मागे घ्यावे लागले. हे कॉँग्रेसचे यश आहे. पेट्रोल, डिझेल, गॅस यासह जीवनावश्यक वस्तूची महागाई करून हे सरकार जनतेला वेठीस धरत आहे.’’ बाबूराव शिंदे यांनी तालुक्यातील शेतकऱ्यांच्या उसाची समस्या निरीक्षकांपुढे मांडली. किसन वीर सहकारी साखर कारखाना कायद्याच्या कचाट्यात सापडून बंद राहिल्यास शेतकऱ्यांचे नुकसान होणार आहे. यासाठी कायदेशीर बाबी बाजूला सारून शेतकऱ्यांच्या उसाचा प्रश्न सोडविण्यासाठी किसन वीर कारखाना सुरू करण्यासाठी परवानगी द्यावी, अशी मागणी केली. दरम्यान, बाजारपेठेतून रॅली काढून पेट्रोल, डिझेल, गॅस महाग करणाऱ्या व शेतकऱ्यांवर अन्याय करणाऱ्या मोदी सरकारच्या निषेधाच्या घोषणा कार्यकर्त्यांनी दिल्या.
हेही वाचा: मुंबईच्या गुंडगिरीला ‘सातारी हिसका’ सोसणार नाही : शिवेंद्रराजे
Esakal