
देशात ३६ वा क्रमांक प्राप्त करणारी मृणाली जोशी राज्यात पहिली
5 तासांपूर्वी
नवी दिल्ली: केंद्रीय लोकसेवा आयोगाच्या स्पर्धा परिक्षांमध्ये घवघवीत यश मिळवून महाराष्ट्राचा झेंडा बुलंद करणाऱ्या ७० हून अधिक गुणवंतांचा राष्ट्रीय राजधानी दिल्लीत सोमवारी (ता. २९) “पुढचे पाऊल” या दिल्लीतील मराठी प्रशासकीय अधिकाऱ्यांच्या संस्थेतर्फे सत्कार होणार आहे.
मागील वर्षी कोरोनामुळे स्पर्धा परीक्षांना आणि निकालाला झालेल्या विलंबामुळे मराठी गुणवंतांचा सत्कार सोहळा होऊ शकला नव्हता. त्यापार्श्वभूमीवर महाराष्ट्रातल्या भावी सनदी अधिकाऱ्यांच्या सत्काराचे “पुढचे पाऊल” तर्फे हे तृतीय पुष्प असल्याचे संस्थेचे सदस्य आणि तामिळनाडूच्या राज्यपालांचे प्रधान सचिव आनंद पाटील यांनी सांगितले.
हेही वाचा: ओमिक्रॉन कोरोनाची तिसरी लाट आणणार?; पाहा व्हिडीओ
राष्ट्रीय मानवी हक्क आयोगाचे सदस्य आणि परराष्ट्र मंत्रालयाचे माजी सचिव डॉ. ज्ञानेश्वर मुळे यांच्या अध्यक्षतेखाली होणाऱ्या सोहळ्यासाठी सर्वोच्च न्यायालयाचे न्यायाधीश भूषण गवई प्रमुख पाहुणे असतील. तर नौदलाचे व्हाईस अॅडमिरल सतिश घोरमाडे, केंद्र सरकारच्या कार्मिक मंत्रालयाचे माजी सचिव दीपक खांडेकर यांची प्रमुख उपस्थिती असेल. या प्रमुख पाहुण्यांच्या गुणवंतांना हस्ते मानचिन्ह आणि प्रशस्तीपत्र देऊन गौरविण्यात येणार आहे.
केंद्रीय औद्योगिक सुरक्षा दलाचे अतिरिक्त महासंचालक प्रमोद फळणीकर, दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांचे सचिव संतोष वैद्य त्याचप्रमाणे संरक्षण खात्यातील कार्यकारी संचालक सुशील गायकवाड हे दिल्लीतील मराठी अधिकारी देखील या कार्यक्रमात हजेरी लावतील. तसेच स्पर्धा परिक्षांची तयारी करणाऱ्यांना मराठी तरुणांना मार्गदर्शनही करतील.
हेही वाचा: ”मोदीजी.. ‘त्या’ देशांतील विमान उड्डाणे त्वरित थांबवावी”
डॉ. ज्ञानेश्वर मुळे हे “पुढचे पाऊल’चे संस्थापक असून, तामिळनाडू केडरचे सनदी अधिकारी आनंद पाटील, डॉ. ज्ञानेश्वर वीर, उन्मेष वाघ, राहुल गरुड , प्रफुल्ल पाठक यांच्यासह १७५ हून अधिक मराठी अधिकाऱ्यांचा पुढचे पाऊल मध्ये सहभाग आहे.
दरम्यान, केंद्रीय लोकसेवा आयोगाच्या (यूपीएससी) मागील वर्षी (२०२०) झालेल्या परिक्षेत देशातील एकूण ७६१ उमेदवारांपैकी महाराष्ट्रातील १०० हून अधिक उमदेवारांनी यश संपादन केले आहे. देशात ३६ वा क्रमांक प्राप्त करणारी मृणाली जोशी राज्यात पहिली आली असून नगरच्या विनायक नरवाडेने देशात ३७ वा क्रमांक पटकावीत राज्यात दुसरे स्थान प्राप्त केले आहे. यासोबतच रजत उभयकर, जयंत नाहाटा, धीनाह दस्तरगीर, विनायक महामुनी यांनी पहिल्या शंभर यशस्वी उमेदवारांमध्ये स्थान पटकावले. या सर्व मराठी उमेदवारांना पुढचे पाऊल तर्फे निमंत्रित करण्यात आले आहे.
Esakal