
5 तासांपूर्वी
मुंबई : महाराष्ट्र लोकसेवा आयोगाची (MPSC) राज्य सेवा मुख्य परीक्षा आणि म्हाडाची भरती (Mhada recruitments) परीक्षा एकाच दिवशी आल्या आहेत. त्यामुळे म्हाडा भरती परीक्षेच्या वेळापत्रकात (Mhada exam timetable) म्हाडा प्रशासनाने बदल केला असून आता 12 डिसेंबरपासून (December) परीक्षा सुरु होणार आहे. या परीक्षेचे हॉल तिकीट (hall ticket) मिळण्याची माहिती संकेतस्थळावर जाहीर करण्यात येणार आहे.
हेही वाचा: Big Breaking : संपूर्ण लसीकरण झालेल्यांनाच प्रवासाची मुभा; राज्य सरकारचा मोठा निर्णय
महाराष्ट्र गृहनिर्माण व क्षेत्रविकास प्राधिकरणाच्या (म्हाडा) आस्थापनेवरील विविध संवर्गातील 565 रिक्त पदांसाठी पावणे तीन लाख उमेदवारांनी अर्ज केले आहेत. यापैकी अनेक उमेदवारांनी एकापेक्षा अधिक पदांसाठी अर्ज भरले आहेत. त्यामुळे म्हाडाने विविध पदांसाठीची परीक्षा एकाच दिवशी आयोजित न करता विविध क्लस्टरमध्ये परीक्षांचे नियोजन केले आहे. या परीक्षेचे वेळापत्रक म्हाडाने जाहीर केले होते. त्यानुसार 5 डिसेंबरपासून परीक्षा सुरु होणार होती. मात्र लोकसेवा आयोगामार्फत घेण्यात येणारी राज्य सेवेची मुख्य परीक्षा 4 ते 6 डिसेंबर या कालावधीत आयोजित करण्यात आली आहे. त्यामुळे म्हाडा प्रशासनाने परीक्षेचे सुधारित वेळापत्रक जाहीर केले आहे.
त्यानुसार 12 डिसेंबर रोजी सकाळच्या सत्रात कार्यकारी अभियंता (स्थापत्य), उप अभियंता (स्थापत्य), सहायक अभियंता (स्थापत्य) आणि सहाय्यक विधी सल्लागार या पदांची परीक्षा आयोजित करण्यात आली आहे. तर दुपारच्या सत्रात कनिष्ठ अभियंता (स्थापत्य) पदाची परीक्षा होणार आहे. तसेच 15 डिसेंबर रोजी दुपारच्या सत्रात कनिष्ठ वास्तुशास्त्रज्ञ सहाय्यक या पदाची परीक्षा होणार आहे. 19 डिसेंबर रोजी सकाळच्या सत्रात लघुटंकलेखक, स्थापत्य अभियांत्रिकी सहाय्यक, भूमापक, अनुरेखक या पदांची परीक्षा होणार आहे. तर 19 डिसेंबर दुपारच्या सत्रात सहायक, वरिष्ठ लिपिक, कनिष्ठ लिपिक टंकलेखक या पदांची परीक्षा होणार आहे.
20 डिसेंबर रोजी दुपारच्या सत्रात मिळकत व्यवस्थापक/प्रशासकीय अधिकारी या पदासाठी परीक्षा होणार आहे. या परीक्षेसाठी अर्ज केलेल्या उमेदवारांना म्हाडाच्या संकेतस्थळावरून हॉल तिकीट डाउनलोड करण्याची सुविधा देण्यात येणार आहे. याची सूचना उमेदवारांच्या मेल आयडी आणि मोबाइलवर देण्यात येणार आहे.
Esakal