सांगवी : संविधान दिनी सत्यशोधक पद्धतीने विवाह सोहळा संपन्न
sakal_logo

द्वारे

रमेश मोरे : सकाळ वृत्तसेवा

पिंपरी (जुनी सांगवी) : कुठलाही ठाम डौल नाही.अनावश्यक खर्च व रुढी परंपरांना फाटा देत जुनी सांगवी येथे व-हाडी मंडळींना महापुरूषांच्या विचारांचे ग्रंथ वाटप व महापुरुषांच्या प्रतिमांना अभिवादन करून महात्मा ज्योतीबा फुले यांच्या सत्यशोधक विवाह पद्धतीनुसार आगळा वेगळा विवाह सोहळा पार पडला. संविधान दिनाचे औचित्य साधून वधू-वर व उपस्थितांनी संविधान प्रस्तावना वाचन करून लग्न सोहळ्यास सुरूवात केली.कोरोनाच्या संकटाच्या पार्श्वभूमीवर या विवाहाच्या निमित्ताने कोरोना जागृती सोबतच समाज जागृतीचा सामाजिक संदेशही समाजास देण्यात आला . या सत्यशोधक लग्न सोहळ्याच्या माध्यमातून कोरोनाच्या संकटात खर्चिक लग्नसोहळा टाळण्याचा एक आदर्शही समाजासमोर प्रस्थापित केला आहे .

पिंपरी चिंचवड शहरातील सांगवी परिसरातील नेहा नाडे व महादेव खंडागळे यांनी क्रांतीसुर्य महात्मा ज्योतिबा फुले प्रणित सत्यशोधक पद्धतीने विवाह करून विवाहबद्ध झाले. सांगवीतील मल्हार गार्डन पार पडलेल्या या सोहळ्यास आ .लक्ष्मण जगताप,महापौर उषा ढोरे, स्थायी सदस्य संतोष कांबळे, माजी विरोधी पक्षनेते नाना काटे,शहर कार्याध्यक्ष रा.कॉ.प्रशांत शितोळे, जवाहर ढोरे,हर्षल ढोरे,फिनिक्स सोशल ऑर्गनायझेशनचे सर्व सदस्य उपस्थित होते.

आ‌.लक्ष्मण जगताप,महापौर उषा ढोरे, सत्यशोधक प्रबोधन महासभेच्या प्रतिमा परदेशी यांच्या हस्ते महापुरूषांच्या प्रतिमेला पुष्पहार घालून अभिवादन करण्यात आले.यावेळी मी सावित्रीबाई फुले बोलतेय ही एकांकिका व्याख्याता उषा कांबळे यांनी सादर केली. यावेळी शहरातील विविध क्षेत्रातील अनेक मान्यवर उपस्थित राहून या अनोख्या सोहळ्यात नवदांपत्यांना शुभेच्छा दिल्या . या विवाहाच्या वेळी उपस्थितांना नवविचारांचा वसा जोपासण्यासाठी पुस्तक भेट देण्यात आले.

हेही वाचा: शेतकऱ्यांची आणखी एक मागणी मान्य, कृषीमंत्र्यांची मोठी घोषणा!

देशातील पहिला सत्यशोधक विवाह महात्मा फुले यांनी घडवुन आणला होता. पुरोहिताशिवाय लावलेला हा विवाह २५ डिसेंबर १८७३ रोजी पार पडला होता. पिंपरी-चिंचवड शहरात प्रथमच फिनिक्स सोशल ऑर्गनायझेशनच्या वतीने या लग्न सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते.

आजही सत्यशोधक विवाह ही काळाची गरज आहे . अतिशय साधी , सरळ व सोपी विवाह पद्धत महातृमा फुले यांनी १९ व्या शतकातच दाखवुन दिली. या सोहळ्यात महापुरूषांच्या पुतळयास अभिवादन केले जाते . अक्षदा धान्याऐवजी फुलांच्या पाकळ्या वापरल्या जातात.वधु वरांच्या मध्ये अंतरपाट धरुन महात्मा फुले यांनी लिहिलेल्या सुंदर मंगलाष्टकांचे गायन केले जाते . महात्मा फुले यांनी लिहीलेली शपथ वर – वधुस दिली जाते. वरवधुंनी एकमेकांच्या गळ्यात पुष्पमाळा घातल्यानंतर त्यांच्या वस्त्राची महासत्यगाठ बांधली जाते. ना हुंडा , ना आर्थिक देवाणघेवाण अशा प्रकारे अगदी साध्या पद्धतीने हा विवाह सोहळा संपन्न करण्यात आला.



Esakal

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here