
२८ नोव्हेंबर २०२१
नांदेड : इ-पीक पाहणी प्रकल्पातंर्गत पीक पेरा नोंदणीच्या कालावधीत नांदेड जिल्ह्यात तीन लाख ६७ हजार ९३३ खातेदारांनी पिकांचा पेरा नोंदवला आहे. मराठवाड्यात सर्वाधीक नांदेडमध्ये पेरा नोंदविल्याची माहिती महसुलच्या सुत्रांनी दिली. तर दुसऱ्या क्रमांकावर लातूर जिल्ह्याचा समावेश आहे.
महाराष्ट्र शासनाच्या महसूल प्रशासनाकडून शेतकरी स्तरावरील इ-पीक पाहणी प्रकल्पातंर्गत पीक पेरा नोंदणीसाठी ता.३० सप्टेंबरची मुदत होती. हा प्रकल्प महसूल विभाग आणि कृषी विभागाच्यावतीने राबविण्यात आला. माझी शेती, माझा सातबारा, माझा पीक पेरा या घोषवाक्याचा आधारे शासनाने सुरू केलेल्या पीक पाहणी करण्याची सुरुवात ता.१५ ऑगस्टला झाली होती.
हेही वाचा: Corona Update : राज्यात 889 नवीन रुग्ण तर 17 रुग्णांचा मृत्यू
सध्या तलाठी स्तरावरील पीक पाहणी नोंदविण्यात येत असल्याची माहिती सुत्रांनी दिली. जिल्हाधिकारी डॉ. विपीन, जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी रविशंकर चलवदे यांनी शेतकऱ्यांना वेळोवेळी पेरा नोंदणीबाबत आवाहन केले आहे.
दरम्यान मराठवाड्यात या प्रकल्पातंर्गत २० लाख ७५ हजार २६७ खातेदारांनी पिक नोंदणी केली आहे. यात नांदेड जिल्ह्यात सर्वाधीक तीन लाख ६७ हजार ९३३ खातेदारांनी नोंद केली आहे. तर त्यानंतर लातूर जिल्ह्यात तीन लाख नऊ हजार २७८, उस्मानाबाद दोन लाख ६० हजार ४१३, जालना दोन लाख ५५ हजार ९३, बीड दोन लाख ३९ हजार ४३०, औरंगाबाद दोन लाख ३१ हजार ७०८, परभणी दोन लाख १८ हजार ८६२ तर हिंगोली जिल्ह्यात एक लाख ९२ हजार ५४५ खातेदारांनी पीक पेऱ्याची नोंदणी केली आहे.
नांदेडमध्ये हिमायतगर आघाडीवर :
नांदेडमधील सोळा तालुक्यातील सर्वच एक हजार ५५६ गावात ई-पीक पाहणी प्रकल्पातंर्गत पीक पेरा नोंदणीचा कार्यक्रम राबविला. जिल्ह्यात चार लाख ५९ हजार २४ गटात आठ लाख ३८ हजार ३६५ खातेदारांची संख्या आहे. यापैकी ४३.८९ टक्क्यांनुसार तीन लाख ६७ हजार ९३३ खातेदारांनी पीक पेरा नोंदला आहे. यात हिमायतनगर तालुक्यातील ६४.६८ टक्के खातेदारांनी पीक पेरा नोंदला आहे. तर सर्वात कमी धर्माबाद तालुक्यात २९.३८ टक्केच खातेदारांनी यात भाग घेतला.
Esakal