
२८ नोव्हेंबर २०२१
नाशिक : कोरोना संसर्गाच्या काळात खासगी रुग्णालयाकडून रुग्णांना आकारण्यात आलेल्या अतिरिक्त तेरा लाख दहा हजार ५०१ रुपयांचा परतावा मिळाला आहे. २१ खासगी रुग्णालयांनी ३८ रुग्णांकडून अतिरिक्त बिल आकारले होते. कोरोना पहिल्या व दुसऱ्या लाटेमध्ये कोरोना रुग्णांची संख्या मोठ्या प्रमाणात आढळून आली.
सरकारी रुग्णालयांबरोबरच खासगी रुग्णालयेदेखील या काळात फुल झाली. खासगी रुग्णालयांमध्ये आर्थिक लूट सुरू झाल्याच्या तक्रारी मोठ्या प्रमाणात आल्या. त्यामुळे शासनाने ८० टक्के खाटा कोरोना बाधितांसाठी राखीव ठेवण्याचा निर्णय घेतला. त्यासाठी सवलतीचे दरदेखील निश्चित केले. ज्या रुग्णालयाकडून शासनाने ठरवून दिलेल्या दरा व्यतिरिक्त अन्य देयके आकारले असतील त्यांची तपासणी सुरू केली. त्यात शहरातील २१ खासगी रुग्णालयांनी रुग्णांकडून अतिरिक्त बिले आकारल्याची बाब समोर आली.
हेही वाचा: Corona Update : राज्यात 889 नवीन रुग्ण तर 17 रुग्णांचा मृत्यू
महापालिकेच्या लेखापरिक्षण विभागामार्फत शहरातील ५३ खासगी रुग्णालयांना नोटिसा बजावण्यात आल्या. याविरोधात न्यायालयातदेखील दावा दाखल करण्यात आला. परंतु, न्यायालयाने महापालिकेची कारवाई योग्य ठरविताना लेखापरिक्षण विभागाकडे कागदपत्रे सादर करण्याच्या सूचना दिल्या. तपासणीत शहरातील २१ खासगी रुग्णालयांबाबतच्या तक्रारींमध्ये तथ्य आढळले. या रुग्णालयाकडून १३ लाख १० हजार ५०१ रुपये अतिरिक्त बिले वसूल केल्याची बाब आढळून आली.
लेखा परिक्षण विभागाने रुग्णालयांना नोटिसा बजावत अतिरिक्त आकारलेली सदर रक्कम रुग्णांना परत करण्याचे निर्देश दिले. संबंधित रुग्णांच्या बॅंक खात्यावर रक्कमेचा परतावा जमा होतो की नाही हे तपासण्यासाठी पथके नियुक्त केली. खासगी रुग्णालयावर फौजदारी कारवाईचा इशारा दिल्यानंतर अतिरिक्त वसुल केलेली रक्कम रुग्णांच्या बॅंक खात्यावर जमा करण्यात आली.
Esakal