
5 तासांपूर्वी
कोल्हापूर : करवीर निवासिनी श्री अंबाबाई मंदिरात भाविकांना दर्शनासाठी ई-पास बंधनकारक आहे. मंदिरातील गर्दी वाढतच असून, सामान्य अशिक्षित आणि परराज्यातील भाविकांना ई-पासबाबतची तांत्रिक माहिती नसल्याने त्यांना प्रिंटसाठी ३० ते १०० रुपयांचा भुर्दंड सोसावा लागत आहे. याबाबत वारंवार तक्रारी झाल्यानंतर आता अखेर देवस्थान समितीने मंदिर परिसरात ई-पासबाबत इत्यंभूत माहिती देणारे फलक उभारले आहेत. दरम्यान, यानिमित्ताने सुरू झालेल्या दर्शन पासच्या पर्यायी यंत्रणेवर चाप बसणार आहे.
दिवाळीनंतर देशभरातून भाविक मंदिरात दर्शनासाठी येत आहेत. कोल्हापुरात येण्यापूर्वी किंवा आल्यानंतर मोबाईलवरून ई-पासची नोंदणीही ते करतात. पण, तो मोबाईलमध्ये नेमका कुठे सेव्ह केला आहे?, हे अनेकांना समजत नाही. त्याशिवाय अनेकांनी दुसऱ्यांच्या मोबाईलवरून नोंदणी केलेली असते आणि गर्दीमुळे ते अन्यत्र राहतात. त्यामुळेही दर्शन रांगेत गर्दी अधिक असल्यास गोंधळ उडतो. या साऱ्या पार्श्वभूमीवर ई-पासची प्रिंट काढून घेतली जाते. मात्र, त्यासाठी मंदिर परिसरातील दुकानदारांकडून प्रतिप्रिंट किमान २० ते ३० रुपये आकारले जातात.
हेही वाचा: Corona Update : राज्यात 889 नवीन रुग्ण तर 17 रुग्णांचा मृत्यू
ई-पास नोंदणी न करताच मंदिरात येणाऱ्यांची संख्याही मोठी आहे. त्यामुळे अशा भाविकांना दुपारच्या वेळेतील स्लॉटमध्ये ई-पास काढण्याची संधी बऱ्याचदा मिळते. असे आयत्यावेळी पास काढून देण्यासाठीही ही यंत्रणा कार्यरत आहे. त्यामुळे देवस्थान समितीने ई-पास तपासण्याच्या व्यवस्थेशिवाय आणखी एक मार्गदर्शन कक्ष उभा करावा आणि तेथे भाविकांना सुलभ दर्शनासाठीचे मार्गदर्शन उपलब्ध व्हावे, अशी मागणी भाविकांतून वारंवार होत आहे. त्याचाच एक भाग म्हणून आता माहिती फलक उभारले आहेत.
‘सकाळ’ने वेधले लक्ष
अंबाबाई मंदिर परिसरातील दर्शन पासच्या पर्यायी यंत्रणेबाबत ‘सकाळ’ने पंधरा नोव्हेंबरला ‘ई-पास प्रिंटसाठी तीस रुपयांचा भुर्दंड’ अशा मथळ्याखाली वृत्त प्रसिद्ध केले होते. त्यानंतर काही भाविकांनी देवस्थान समितीसह जिल्हा प्रशासनाकडेही याबाबतच्या तक्रारी केल्या होत्या.
Esakal