
5 तासांपूर्वी
नागपूर : राज्य शासनाने एसटी कर्मचाऱ्याच्या वेतनात भरघोस वाढ केली. मात्र, कर्मचारी विलिनीकरणाच्या मागणीवर ठाम आहेत. संप सुरुच ठेवण्याची त्यांची भूमिका आहे. यामुळे नागपूर विभागातील विविध आगारातून बस बाहेर पडल्या नाहीत. एकही कर्मचारी रुजू न झाल्याने प्रशासनाने कार्यवाहीचा बडगा उगारला. महामंडळाकडून शनिवारी तब्बल २०० कर्मचाऱ्यांचे निलंबन करण्यात आले. विभागातील आजवरची सर्वांत मोठी कारवाई आहे. या कारवाईमुळे संपकर्त्या कर्मचाऱ्यांमध्ये असंतोष पसरला आहे.
पंधरा दिवसापासून एसटी कर्मचाऱ्यांचा संप सुरू आहे. नागपूर विभागात ११ कोटीचे नुकसान झाले आहे. राज्यव्यापी संपात नागपुरातीलही चालक, वाहक, यांत्रिकी कर्मचारी व लिपिक सहभगी झाले आहेत. यामुळे नागपूरच्या मध्यवर्ती बस स्थानकासह इतर आगारातून एकही बस बाहेर पडली नाही.
हेही वाचा: Corona Update : राज्यात 889 नवीन रुग्ण तर 17 रुग्णांचा मृत्यू
प्रशासनाने कठोर भूमिका घेत शनिवारी (ता. २७) रोजी पुन्हा नागपूर विभागातील सावनेर, काटोल, उमरेड, रामटेक, इमामवाडा, घाटरोड, गणेशपेठ व वर्धमाननगर या आठ आगारातील प्रत्येकी २५ अशा तब्बल २०० कर्मचाऱ्यांवर निलंबनाची कारवाई केली. त्यामुळे आता नागपूर विभागातील एकूण संपकर्त्या ३४८ वर कर्मचाऱ्यांचे निलंबन करण्यात आले.
रोंजदारीवरील ९० घरी गेले
रोजंदारीवरील कर्मचाऱ्यांना चोवीस तासांत कामावर रुजू होण्याची नोटीस देण्यात आली होती. परंतु, या कंत्राटी कामगारांनीही संपाला पाठिंबा दिला असून कुणीही कामावर रुजू झाले नाही. यामुळे पहिल्या टप्प्यात ५७ जणांच्या सेवा समाप्त करण्यात आल्या. आणखी २३ कंत्राटी कर्मचाऱ्यांची सेवा समाप्त करण्यात आली. आता एकूण ९० कंत्राटी कर्मचाऱ्यांची सेवा समाप्त केली असल्याची माहिती नागपूर विभाग नियंत्रक डी. सी. बेलसरे यांनी दिली.
Esakal