
5 तासांपूर्वी
बेळगाव : महाराष्ट्र परिवहन महामंडळाची आंतरजिल्हा बससेवा शनिवारी (ता. २७) कोल्हापुरात सुरू झाली आहे. त्यामुळे, कर्नाटक परिवहन महामंडळ बेळगाव-कोल्हापूर बससेवा सुरू करण्यास उत्सुक असून, कोल्हापुरातील नियंत्रकांच्या संपर्कात आहे. तेथून मंजुरी मिळताच आंतरराज्य बससेवा सुरु करण्यात येणार आहे.
कोल्हापुरातील आंतरजिल्हा बससेवा सुरु झाल्याने बेळगावातून वायव्य परिवहन महामंडळाच्या अधिकाऱ्यांनी कोल्हापूर आगाराच्या नियंत्रकांशी दूरध्वनीवरुन चर्चा केली. बेळगाव-कोल्हापूर बससेवा सुरू करण्यासह कर्नाटक-महाराष्ट्र आंतरराज्य सेवा सुरु करण्यावर यावेळी चर्चा झाली. पण सध्या तरी आंतरराज्य सेवा सुरु न करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. रविवारी (ता. २८) एसटी महामंडळ कर्मचाऱ्यांच्या आंदोलनाची दिशा पाहूनच आंतरराज्य सेवा सुरु केली जाणार आहे. बेळगावातून महाराष्ट्रात सेवा सुरु केली जावी, यासाठी वायव्य परिवहन मंडळाकडून सातत्याने प्रयत्न सुरु आहे. प्रवाशांकडूनही याबाबतची मागणी वाढली आहे.
बेळगावातून महाराष्ट्रात परिवहन सेवा सुरु झाल्यास बेळगावातील प्रवाशांना ते सोयीस्कर ठरणार आहे. तर चंदगड आणि कोवाड परिसरातील प्रवाशांनाही फायदा होणार आहे. बेळगाव आणि कोल्हापूर
दरम्यानच्या बससेवेला नेहमीच चांगला प्रतिसाद मिळतो. रोज मोठ्या प्रमाणात कामगार या सेवेचा लाभ घेतो. त्यामुळे, ही सेवा सुरु करण्याची आग्रही मागणी आहे. त्यामुळे महाराष्ट्रातील कर्मचाऱ्यांनी आंदोलन मागे घेताच बेळगाव-कोल्हापूर आंतरराज्य बससेवा सुरु केली जाणार आहे.
कोल्हापुरात आंतरजिल्हा बससेवा सुरु झाली आहे. पण, अद्याप कोल्हापुरातील बससेवा विस्कळीत आहे. ही सेवा पूर्वपदावर येताच बेळगाव-कोल्हापूर दरम्यान आंतरराज्य सेवा सुरु केली जाणार आहे.
– शिवराज जाधव, नियंत्रक कोल्हापूर आगार.
‘कोल्हापूर नियंत्रकांच्या सातत्याने संपर्कात आहोत. त्यांनी बेळगाव-कोल्हापूर सेवा सुरु करण्यासंबंधी निर्णय कळविलेला नाही. तेथून मंजुरी मिळताच बेळगावातून परिवहनच्या बसेस कोल्हापूरकडे आणि महाराष्ट्रातील इतर ठिकाणी धावणार आहेत.’
– के. के. लमाणी, परिवहन अधिकारी, बेळगाव
Esakal