हनी ट्रॅपच्या जाळ्यात आणखी दोघे
sakal_logo

द्वारे

सकाळ वृत्तसेवा

उजळाईवाडी : हनी ट्रॅप प्रकरणी गोकुळ शिरगाव पोलिस ठाण्यात आज आणखी एक गुन्हा दाखल झाला. एका व्यापाऱ्याला जीवे मारण्यासह व्हिडिओ व्हायरल करण्याची धमकी देत ९० हजार रुपये उकळण्यात आले आहेत. या प्रकरणी एका महिलेसह जितू शिंदे, प्रथमेश शिंगे अशा तीन संशयितांवर गुन्हा दाखल झाल्याचे पोलिसांनी सांगितले.

याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी : शहर परिसरातील एका व्यापाऱ्याशी एका महिलेने मोबाईल व सोशल मीडियाच्या माध्यमातून ओळख निर्माण केली. तिने त्यांना ऑगस्टमध्ये चित्रनगरी परिसरातील एका हॉटेलमध्ये बोलवून घेतले. येथे तिच्या दोन साथीदारांनी व्हिडिओ चित्रीकरण केले. त्यानंतर संबंधित उद्योजकास तिघांनी संबंधित व्हिडिओ त्यांच्या घरी दाखविण्याची व जीवे मारण्याची धमकी देत ९० हजार रुपये उकळले. त्यानंतर आणखी ३५ हजार रुपयांची मागणी केली. बदनामीला घाबरून संबंधित व्यापाऱ्याने याबाबत अद्याप तक्रार दिली नव्हती. मात्र आज त्यांनी याबाबत गोकुळ शिरगाव पोलिस ठाण्यात फिर्याद दिली. त्यानुसार संशयित जितू, प्रथमेशसह एक महिला अशा तिघांवर गुन्हा नोंद करण्यात आला.

बड्या व्यापाऱ्याची लुबाडणूक

कागल : हनी ट्रॅपच्या माध्यमातून आपली लुबाडणूक झाल्याची फिर्याद एका बड्या व्यापाऱ्याने कागल पोलिस ठाण्यात दाखल केल्याचे समजते. त्यानुसार एका महिलेसह तिचा पती आणि इतर चौघांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आल्याचे समजते. याबाबत कागल पोलिसांकडून अधिकृत माहिती मिळू शकली नाही.

या प्रकारात संबंधित व्यापाऱ्याला हनी ट्रॅपच्या माध्यमातून जाळ्यात अडकविण्यासाठी संशयिताने आपल्या पत्नीलाच गुंतविल्याचे समोर आले आहे. डिसेंबर २०२० ते फेबुवारी २०२१ दरम्यान हा प्रकार घडला. यातील मुख्य संशयित महिलेने संबंधित व्यापाऱ्याला आपल्या मोहजालात अडकविले. त्यानंतर बदनामीची धमकी देऊन आपल्याकडून एक लाख रुपये उकळल्याचे संबंधित व्यापाऱ्याने फिर्यादीत म्हटले आहे. संशयित महिलेला तिच्या पतीनेच व्यापाऱ्याशी ओळख करून दिली. मोबाईल चॅटिंगच्या माध्यमातून दोघांमध्ये जवळीक निर्माण झाली. संबंधित महिला आणि तिच्या पतीसह अन्य चौघांनी व्यापाऱ्याला ठिकठिकाणी लॉज आणि हॉटेलवर नेऊन मोबाईलद्वारे त्याचे चित्रीकरण केले. या चित्रीकरणाची भीती दाखवून आपल्याकडून वेळोवेळी पैसे उकळण्यात आले आहेत, असे फिर्यादीत म्हटल्याचे समजते.Esakal

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here