
5 तासांपूर्वी
कुडित्रे : करवीर तालुक्यातील कुडित्रे, कोपार्डे, वाकरे येथे महावितरणची धडक कारवाई सुरू झाली आहे. सुमारे १३० शेतकऱ्यांचे घरगुती वीज कनेक्शन तोडले आहे. यामुळे सव्वाशे शेतकऱ्यांची आज रात्र अंधारात जाणार आहे. आता रॉकेल ही मिळत नाही. यामुळे वीज तोडलेल्या शेतकऱ्यांच्या घरी मुलांच्या अभ्यासाचा प्रश्न निर्माण झाला आहे.
कुडित्रे शाखेची सुमारे ४२ लाख थकबाकी आहे. यात कुडित्रे गावातील सुमारे १० लाख थकबाकी आहे. वाकरे येथे १२ लाख आणि कोपार्डे येथे सुमारे १६ लाख लाख घरगुती बाकी आहे. यात सांगरूळ फाटा परिसरातील संख्या अधिक आहे. थकबाकीबाबत महावितरणने अधिकाऱ्यांना पत्र काढल्यानंतर आज कारवाईचा बडगा उगारला आहे. दीड महिना बिल न भरलेले आणि दोन हजार रुपये वरील थकबाकी ग्राहकांचे वीज कनेक्शन तोडले. यात वाकरे येथील सुमारे ५१, कोपार्डे ३८, कुडित्रे येथील ४० शेतकऱ्यांचे वीज कनेक्शन तोडले आहे.
कोरोनानंतर गेल्या मार्चपासून गाव सभा झाल्यानंतर भरणा चांगला झाला. यानंतर अधिकाऱ्यांचाही सत्कार झाला होता. आता शेतकरी आर्थिक अडचण असल्यामुळे वीज बिल भरू शकत नाही, असे चित्र आहे. दरम्यान, वीज तोडल्यामुळे शेतकऱ्यांना आज अंधारात रात्र काढावी लागणार आहे. दरम्यान, याबाबत अधिकाऱ्यांना फोनवर संपर्क साधला असता शेतकऱ्यांची वीज तोडली, असे विचारले असता ग्राहक म्हणा असे प्रत्युत्तर त्यांनी दिले.
शेतकऱ्यांनी घरगुती व शेती पंपाचे वीज बिल भरावे. यात हप्ते मिळणार नाहीत, सूट मिळणार नाही, वीज बिल भरून सहकार्य करावे, यामुळे कर्मचाऱ्यांचा वेळ वाचेल, इतर कामे करता येतील.
– प्रकाश चौगले, कनिष्ठ अभियंता कुडित्रे.
अनेक वर्षे शेतकऱ्यांच्या शेतात विजेचे खांब, डीपी विनामोबदला उभे आहेत, एक टन उसाचे नुकसान होते. महावितरण एक रुपये मोबदला देत नाही. कायदा असूनही पैसे दिले जात नाही. आता वीज बिलाला व्याज दंड आकारला जातो. यातून थकलेल्या वीज बिलाचे पैसे वजा करून घ्यावेत.
– बदाम शेलार ,शेतकरी कुडित्रे,
Esakal