
5 तासांपूर्वी
दाभोळ – कुणबी समाजाची मातृसंस्था असलेल्या कुणबी समाजोन्नती संघासाठी राज्य शासनाच्यावतीने देण्यात आलेला ५ कोटी रुपयांचा निधी हा कोणाचा पक्षप्रवेश व्हावा, या आमिषापोटी दिलेला नसून राज्य शासनाचे या समाजासाठी असा निधी देणे, हे कर्तव्यच होते. त्यामुळे पक्षप्रवेश हे होतच असतात. आमचे मार्गदर्शक आमदार भास्कर जाधव यांनी याबाबत केलेले विधान दुर्दैवी असून कुणबी समाजाचा अपमान करणारे आहे, असे मत खासदार सुनील तटकरे यांनी दापोली येथे झालेल्या पत्रकार परिषदेत व्यक्त केले.
काही दिवसांपूर्वी आमदार भास्कर जाधव यांनी पाच कोटीचे आमिष दाखवून तटकरे यांनी कुणबी समाजातील नेत्यांना आपल्याकडे वळवल्याचे विधान केले होते. याबाबत तटकरे म्हणाले, प्रत्येक पक्षप्रवेश हे आमिष दाखवून केले जाते, अशी भूमिका शिवसेनेतून राष्ट्रवादी व राष्ट्रवादीतून शिवसेनेत गेलेल्या भास्कर जाधवांनी मांडणे, हे हास्यास्पद आहे. रायगड-रत्नागिरी स्थानिक स्वराज्य संस्थेची जागा कुणबी समाजाला द्यावी, अशी मागणीही जाधव यांनी केली असता शिवसेनेने यापूर्वी या मतदारसंघाबाहेरील व्यक्तीला उमेदवारी दिली होती.
हेही वाचा: भास्कर जाधवांच्या भेटीवरून कदमांना तटकरेंनी दिला सल्ला
भास्कर जाधवदेखील या मतदारसंघातून आमदार झाले होते. उमेदवारी कोणाला द्यायची, याचा निर्णय पक्षश्रेष्ठी व महाविकास आघाडीचे नेते घेतील. भास्कर जाधव यांचा सल्ला मात्र आम्ही वेळोवेळी घेऊ, अशी खोचक टीका त्यांनी केली. या पत्रकार परिषदेला माजी आमदार संजय कदम, जिल्हाध्यक्ष बाबाजी जाधव, प्रदेश सरचिटणीस संदीप राजपुरे, जिल्हा सरचिटणीस शंकर कांगणे आदी उपस्थित होते.
कृषी, कामगार विधेयकावर भूमिका मांडणार
लोकसभेचे अधिवेशन सुरू होत असून या अधिवेशनामध्ये बहुमताच्या जोरावर जे कृषी व कामगार विधेयक मांडण्यात आले होते. ते सरकार मागे घेणार असून विविध विषयांवर विरोधक म्हणून आम्ही निश्चितच प्रभावी भूमिका मांडू, असे सांगतानाच कोकणातील विविध प्रश्न या अधिवेशन काळात मार्गी लावण्याचा प्रयत्न खासदार सुप्रिया सुळे यांच्या माध्यमातून केले जातील, असे तटकरे यांनी सांगितले.
हेही वाचा: राज्यातील ठाकरे सरकार ‘३ प’ पुरते मर्यादित; भाजपची बोचरी टीका
जनसंपर्क कार्यालय मास मीडिया
दापोली शहरामध्ये आज उदघाटन झालेले जनसंपर्क कार्यालय हे जनसंवादाचे आगामी काळात एक प्रमुख माध्यम झालेले आपल्याला पाहावयास मिळेल. समाजातील विविध घटक येथे आपल्या समस्या मांडतील व जनसेवक या नात्याने मी त्या निश्चितच दूर करेन, असा विश्वास तटकरे यांनी व्यक्त केला.
Esakal