
5 तासांपूर्वी
मुंबई : कोणी रोडरोमिओ आपल्यावर पाळत ठेवतो व आपण हतबल होतो, या काही महिलांना येणाऱ्या भीतीदायक अनुभवाची कल्पना आता ताकदवान मंत्री नबाब मलिक यांना आली असेल, अशा शब्दांत भाजपच्या मुंबई महिला मोर्चाच्या अध्यक्ष श्रीमती शीतल गंभीर देसाई यांनी मलिक यांना आरसा दाखवला आहे.
आपल्यावर पाळत ठेवली जात असल्याचा आरोप नबाब मलिक यांनी केला आहे. त्यावरून भाजपच्या अनेक नेत्यांनी त्यांची यथेच्छ खिल्ली उडवली. खाई त्याला खवखवे अशी मलिकांची अवस्था झाल्याचा टोला विधानपरिषदेतील विरोधीपक्षनेते नबाब मलिक यांनी लगावला आहे. तर स्वतः कॅबिनेट मंत्री, आपल्याच पक्षाचा गृहमंत्री, तरीही स्वतःवर पाळत ठेवली जात असल्याचा आरोप मलिक करतात, शुद्धीवर आहेत ना, असे बोचरे ट्वीट भाजप आमदार अतुल भातखळकर यांनी केले आहे.
काहीजणांनी माझ्यावर, माझ्या कुटुंबावर तसेच माझ्या घरावर पाळत ठेवल्याचा आरोप मलिक यांनी ट्वीटरवर केला आहे. अनेक दिवसांपूर्वी हा प्रकार झाल्याचेही त्यांनी म्हटले आहे. असे असेल तर तुम्ही पोलिसांकडे न जाता पत्रकारांकडे याबाबत तक्रार का करता, असा प्रश्न भाजप नेत्यांनी विचारला आहे. यासंदर्भात टीका होऊ लागल्यावर आता आपण याबाबत पोलिसांकडे तक्रार करणार असल्याचा दावा मलिक यांनी केला आहे. मात्र हाच मुद्दा धरून श्रीमती देसाई यांनी मलिकांसमोर महिला सुरक्षेचा प्रश्न उपस्थित केला आहे.
हेही वाचा: नांदेड : प्रक्रिया उद्योगातून महिला बचतगटांची भरारी
आज राज्यात कित्येक महिलांवर अत्याचार होत आहेत. छेडछाड, विनयभंग, अपहरण, बलात्कार या गुन्ह्यांची संख्या वाढते आहे. या महिलांवर पाळत ठेऊनच हे गुन्हे होतात, अशी पाळत ठेवली जात असताना या महिलांना काहीही करता येत नाही. पोलिसांकडे याबाबत तक्रार केली तरी फारसे काही हाती लागत नाही. महिलांना येणाऱ्या या विदारक अनुभवाची कल्पना आता मलिक यांना आलीच असेल. अशा प्रसंगात त्या महिलांना कसे वाटत असेल हे देखील मलिक यांना चांगलेच कळले असेल. मलिक यांच्यासारख्या ताकदवान मंत्र्यांवर खुलेआम पाळत ठेवली जाते व कोणीच काहीही करू शकत नाही. यावरून राज्याचे गृहखाते काय करीत आहे व राज्यातील महिला किती सुरक्षित आहेत, याची कल्पना कोणीही करू शकतो. त्यामुळे आता मलिक यांनी महिला सुरक्षेसाठी जास्त प्रयत्न करावेत. तसेच आपल्यावर पाळत ठेवली जात असल्याबद्दल राज्याच्या गृहमंत्र्यांचा राजिनामा मागावा, असेही श्रीमती देसाई यांनी मलिक यांना सुनावले आहे.
Esakal