
Beed | योगेश्वरी मंदिर उडविण्याची धमकी, ५० लाखांची खंडणी मागितली
5 तासांपूर्वी
अंबाजोगाई (जि.बीड) : परळीची घटना ताजी असतानाच योगेश्वरी मंदिरही (Yogeshwari Temple) आरडीएक्सने (RDX) उडवून देण्याच्या धमकीचे पत्र कथित व्यक्तिकडून आले आहे. शुक्रवारी (ता.२६) योगेश्वरी देवस्थानला टपालाने हे पत्र प्राप्त झाले. या पत्रावर पाठवणाराचे नाव असून त्याची (Ambajogai) रितसर तक्रारही देवल समितीच्या सचिवांनी शनिवारी (ता.२७) रात्री शहर पोलिस ठाण्यात दिली आहे. याचा गुन्हा दाखल झाला आहे. एका कागदावर मराठीत लिहिलेले हे धमकी पत्र बंद पाकिटात देवस्थानच्या कार्यालयात पोस्टमनमार्फत मिळाले. शनिवारी हे पत्र देवस्थानचे सचिव ॲड.शरद लोमटे यांनी ते फोडून पाहिले असता, नांदेड जिल्ह्यातील एका व्यक्तीने ते पाठवले आहे. त्यात देवस्थान उडवून देण्याची धमकी होती. ॲड. लोमटे यांनी प्रत्यक्ष पोलिस ठाण्यात जाऊन पत्र दाखवले व रितसर तक्रारही दिली. (Beed)
हेही वाचा: महाविश्वासघाती आघाडी, प्रकाश जावडेकर यांची राज्य सरकारवर टीका
असा आहे पत्रातील मजकुर
आपले देवस्थान पुरातन आहे. त्याकडून आपण वारेमाप देणगी रूपाने बेकायदेशीर व बेहिशोबी जमा केली आहे. मी फार मोठा गुंड आहे. व ड्रग माफिया देखील आहे. त्या अनुषंगाने मी कोणालाही भित नाही. माझ्या खासगी महत्त्वाच्या कामासाठी ५० लाख रुपयांची खंडणी म्हणून आपल्या संस्थानकडून त्वरीत हवे आहेत. हे पत्र मिळताच उलट टपाली मला खंडणी म्हणून माझे खालील पत्यावर पोच करण्याची व्यवस्था करावी. यात कसूर होऊ नये, नसता मी आपले देवालय आरडीएक्स (इंग्रजी शब्द) ने उडवून देईन. कळावे या पत्रावर प्रभाकर नामदेव पुंड (रा. पिंपळगाव (नि), ता.जि.नांदेड मो. क्रं. ९५२७४८२७१०) असा उल्लेख आहे. देवल समितीने दिलेल्या तक्रारीवरून येथील शहर पोलिस ठाण्यात अदखलपात्र गुन्हा दाखल झाला आहे.
Esakal