
5 तासांपूर्वी
मुंबई : महाराष्ट्र गृहनिर्माण व क्षेत्रविकास प्राधिकरणाच्या (म्हाडा) आस्थापनेवरील विविध संवर्गातील 565 रिक्त पदांसाठी 12 डिसेंबरपासून परीक्षा सुरु होणार आहे. या परीक्षेसाठी परीक्षा केंद्रामध्ये प्रवेश करताना उमेदवारांना किमान तीन पदरी कापडाची मुखपट्टी (मास्क) परिधान करणे म्हाडाने अनिवार्य केले आहे. त्याचप्रमाणे कोरोनाची लक्षणे दिसून येणाऱ्या उमेदवारांची परीक्षेसाठी स्वतंत्र बैठक व्यवस्था करण्याचा निर्णय प्रशासनाने घेतला आहे.
महाराष्ट्र लोकसेवा आयोगाची राज्य सेवा मुख्य परीक्षा आणि म्हाडा भरती परीक्षा एकाच दिवशी आल्या आहेत. त्यामुळे परीक्षेच्या वेळापत्रकात म्हाडा प्रशासनाने बदल केला असून 12 डिसेंबरपासून परीक्षा सुरु होणार आहे. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर परीक्षेला बसणाऱ्या उमेदवारांच्या आरोग्याच्या सुरक्षिततेसाठी प्रशासनाने सूचना जारी केल्या आहेत. त्यानुसार परीक्षा केंद्रामध्ये प्रवेश करताना उमेदवारांना किमान तीन पदरी कापडाची मुखपट्टी परिधान करणे अनिवार्य केले आहे. परीक्षा केंद्रावर सॅनिटाईझरची सुविधा उपलब्ध करून देण्यात येणार आहे. या सुविधेचा वापर परीक्षेदरम्यान करावा लागेल.
हेही वाचा: की-बोर्डवरील Function Keys कोणत्या अन् कसा होतो वापर, जाणून घ्या
तसेच कोरोनाची लक्षणे असणाऱ्या जसे की, ताप, सर्दी, खोकला इत्यादी दिसून आल्यास उमेदवारांनी याची माहिती परीक्षा केंद्रावरील पर्यवेक्षक यांना कळवावी. त्यानुसार अशा उमेदवारांची परीक्षेची स्वतंत्र बैठक व्यवस्था करण्यात येणार आहे. त्याचप्रमाणे उमेदवारांनी परीक्षा केंद्रावर प्रवेश करताना तसेच परीक्षा केंद्राबाहेर जाताना शारीरिक अंतर राखणे अनिवार्य असून वापरलेले टिश्यू पेपर, मुखपट्टी, हातमोजे, सॅनिटाईज पाऊच इत्यादी वस्तू कचराकुंडीमध्येच टाकाव्यात, अशा सूचना प्रशासनाने जारी केल्या आहे.
Esakal