Omicron कोरोना प्रकार
sakal_logo

द्वारे

टीम ई सकाळ

जोहान्सबर्ग: दक्षिण आफ्रिकेमध्ये कोरोनाचा एक नवा व्हेरियंट आढळला आहे. हा नवा व्हेरियंट अत्यंत संक्रमणकारी आहे. अफ्रिकेमध्ये सर्वप्रथम आढळलेल्या ‘ओमिक्रॉन’ या नव्या प्रकारच्या विषाणूच्या भीतीने अनेक देशांनी या देशातून येणाऱ्या विमानांना बंदी घातली आहे. यामुळे या देशातील उद्योग-व्यवसायांना फटका बसला आहे. त्यामुळे आता नवा विषाणू शोधण्याची क्षमता असल्याची शिक्षाच आम्हाला भोगावी लागत आहे, अशी खंत दक्षिण आफ्रिकेच्या परराष्ट्र विभागाने व्यक्त केलीये.

हेही वाचा: न्यूझीलंडच्या खासदार बाळंतपणासाठी सायकलवरून रुग्णालयात,फोटो Viral

‘ओमिक्रॉन’चा प्रसार रोखण्याची गरज असली तरी टोकाच्या उपाययोजना राबवू नयेत, असे सर्व जगाला आवाहन करणारे निवेदन दक्षिण आफ्रिकेच्या परराष्ट्र विभागाने प्रसिद्ध केलंय. ‘आमच्या देशावर प्रवासबंदी लागू करण्यात आली आहे. जिनोम साखळीबाबतचे अत्याधुनिक तंत्रज्ञान आणि नवीन विषाणू शोधून काढण्याची आमची क्षमता असल्याची एकप्रकारे शिक्षाच आम्हाला भोगावी लागत आहे. हा नवा प्रकार इतरही काही देशांमध्ये आढळून आला असून संबंधित रुग्णांचा दक्षिण आफ्रिकेशी नजीकच्या काळात संपर्क आला नव्हता. मात्र, तरीही दक्षिण आफ्रिकेवरच केवळ बंदी घातली जात आहे,’ अशी नाराजी या निवेदनात व्यक्त करण्यात आली आहे. ज्या देशांनी दक्षिण आफ्रिकेवर प्रवास बंदी घातली आहे, त्यांच्याशी बोलणे सुरु असल्याचेही यावेळी सांगण्यात आले.

हेही वाचा: Viral Video: व्हिसासाठी गेलेल्या महिलेवर भारतीय अधिकारी भडकला

आपल्या जनतेची काळजी घेण्याचा प्रत्येक देशाला हक्क आहे. मात्र, हा जागतिक संसर्ग असून या कालावधीत आपण एकमेकांना सहकार्य करणे अपेक्षित आहे. आमच्यावर अचानक बंदी घातली गेल्याने अनेक कुटुंबांना आणि उद्योगांना फटका बसला आहे, असं मत दक्षिण आफ्रिकेचे परराष्ट्र मंत्री नालेदी पँडोर यांनी मांडलंय.

तर देशाचे आरोग्य मंत्री जो फाहला यांनी म्हटलंय की, आमच्यावर घातलेले निर्बंध हे अत्यंत क्रूर आणि जगाची दिशाभूल करणारे आहेत. जागतिक आरोग्य संघटनेच्या मार्गदर्शक सूचनांचा हा सरळसरळ भंग आहे. जगाचे नेतृत्व करणारे देश या जागतिक प्रश्‍नासाठी कोणालातरी दोषी ठरविण्याचा प्रयत्न करत आहेत.Esakal

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here