
5 तासांपूर्वी
मालेगाव कॅम्प (जि. नाशिक) : येथे महापालिका प्रशासनासह नगरपित्यांना महात्मा ज्योतिबा फुले पुण्यतिथीचा चक्क विसर पडला. मोसम चौकातील फुलेंच्या पुर्णाकृती पुतळ्यास अभिवादन करण्यासाठी नागरिक भल्या पहाटे पोहचले. परंतु, ना पुतळा स्वच्छ, ना परिसर. साफसफाई बघून खेद व्यक्त करण्यात आला. महापालिकेच्या कारभाऱ्यांना भ्रमणध्वनी करून या प्रकाराची जाणीव करून देण्यात आल्यानंतर यंत्रणा खडबडून जागी झाली. या प्रकाराने नागरिकांमध्ये तीव्र संताप व्यक्त करण्यात आला. पुतळा व परिसर स्वच्छतेनंतर पुष्पहार अर्पण करुन फुलेंना अभिवादन करण्यात आले.
येथील मोसम चौकातील महात्मा फुले यांच्या पुतळ्याची महापालिका प्रशासनाकडून जयंती-पुण्यतिथीच्या पूर्वसंध्येलाच पुतळा व परिसर स्वच्छ केला जातो. या वेळी मात्र फुलेंच्या पुण्यतिथीचा लोकप्रतिनिधींबरोबरच प्रशासनालाही विसर पडला. पुतळा परिसरातील अस्वच्छता पाहून काही सामाजिक कार्यकर्त्यांनी अधिकाऱ्यांसह लोकप्रतिनिधींना खडे बोल सुनावले. अनावधानाने स्वच्छतेचे काम काल राहून गेल्याची सारवासारव या वेळी करण्यात आली. पुतळा परिसर स्वच्छतेनंतर या. ना. जाधव विद्यालय व संस्थेचे अध्यक्ष सुनील वडगे, सचिव जीभाऊ अहिरे, प्राचार्य पर्यवेक्षक बी. एस. मंडळ, फुले पतसंस्था उपाध्यक्ष एस. जे. अहिरे, आर. डी. शेवाळे, योगेश पाथरे, अंकुश वाल्हे आदींसह शहरातील विविध संस्था, संघटनांच्या पदाधिकाऱ्यांनी फुले यांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करुन अभिवादन केले.
हेही वाचा: ‘दोन वर्षाच्या काळात महाराष्ट्र 20 वर्षे मागे गेला’ – प्रवीण दरेकर
राष्ट्रपुरुषांच्या जयंती, पुण्यतिथीला पुतळा व परिसर स्वच्छ करणे गरजेचे आहे. अधिकारी व लोकप्रतिनिधींनी याचे भान ठेवून समाज भावनांचा आदर केला पाहिजे.
सुनील वडगे, अध्यक्ष, महात्मा फुले शैक्षणिक संस्था
Esakal