MPSC
sakal_logo

द्वारे

महेश जगताप

पुणे : घरात सतरा पिढ्याची दरिद्री असते, जर ही गरिबी ,सामाजिक अवहेलना संपायवायची असेल तर आपल्याला चांगलं शिक्षण घेऊन उच्च पदावरील सरकारी नोकरी करायची आहे हे स्वप्न घेऊन लाखो तरुण स्पर्धा परीक्षेची तयारी करतात. यासाठी मग पुणे , मंबई, कोल्हापूर, औरंगाबाद, नाशिक अश्या शहरात आपलं नशीब अजमावण्यासाठी येतात. मग कोणाला यश मिळवण्यासाठी सहा, सात तर कधी दहा वर्षाचा कालावधी निघून जातो मात्र यश पदरी पाडूनही पुन्हा नियुक्तीसाठी मंत्री, सरकारी बाबूकडे हेलपाटे मारावे लागतात, तर कधी घेतलेल्या परीक्षेतच महा घोटाळा झालेला असतो अश्या स्पर्धा परीक्षेतील किळसवाण्या प्रकारामुळे अनेक विद्यार्थ्यांचे भविष्य टांगणीला लागलेल आहे. इथले भय संपत नाही अशीच अवस्था स्पर्धा परीक्षा विद्यार्थ्यांची झालेली आहे .

आजमितीला महाराष्ट्रात सर्व प्रकारच्या स्पर्धा परीक्षेची तयारी करणाऱ्या वर्गाची २० लाखाच्या वर संख्या आहे. यासाठी निघणाऱ्या जागा फक्त हजारोंच्या संख्येत आहेत. हे सर्व कळत असतानाही तरुण सरकारी नोकरी मिळवण्याकडे वळतो कारण बाजारात खाजगी नोकरीची असलेली दैना, बेरोजगारांची संख्या मोठी, उधोगधंदा उभारण्यासाठी नसलेले भांडवल, सरकारी नोकरीतून मिळणारी सामाजिक प्रतिष्टा यामुळे लाखो तरुण आपली उमेदीच्या वर्ष घालवून यश मिळवण्यासाठी तडफडत आहेत. त्यात पुन्हा परीक्षेत होणारे महाघोटाळे, परीक्षेचे ढिसाळ नियोजन ,परीक्षेचा निकाल लावण्यास लागणारे महिने ,आणि निवड झाली तरी पुन्हा नियुक्त्यासाठी मंत्रालयात हेलपाटे मारावे लागत असल्याने मग इतका अट्टाहास करून तर काय हाती लागणार असा प्रश्न विद्यार्थी वर्गांच्या मनात उभा राहिला आहे.

महाराष्ट्र राज्य हे देशाला दिशा देणारे राज्य म्हणून आपण बिरुदावली मिरवत असतो पण या राज्यातच तरुणांची अशी उपेक्षा होत असताना राज्यकर्त्यांनी ठोस भूमिका घेणे गरजेचे आहे. जर ही तरुणाई आपल्या कष्टाच्या, मेहनतीच्या जीवावर आपली स्वप्न पूर्ण करू पाहत आहे तर तिच्या आयुष्यात राख कालवण्याचं काम राज्यसरकार व प्रशासकीय यंत्रणेने करू नये जर होणाऱ्या अधिकाऱ्यांना इतक्या त्रासाला सामोरे जावे लागते तर इतरांचे काय होत असेल असा प्रश्न जनसामान्यांना पडल्याशिवाय राहत नाही .

राज्यसरकारने परीक्षा घेत असलेल्या ब्लॅकलिस्ट कंपन्या हटवल्या पाहिजेत, परीक्षेचे तंतोतंत नियोजन केले पाहिजे, महाघोटाळे थांबवले पाहिजेत, परीक्षेचे निकाल लावून लवकर नियुक्त्या दिल्या गेल्या पाहिजे तरच विद्यार्थ्यांचा या व्यवस्थेवर असलेला तोडका, मोडका विश्वास टिकून राहील.



Esakal

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here