
5 तासांपूर्वी
नवी दिल्ली : भाजपचे खासदार गौतम गंभीर यांना ‘ISIS काश्मीर’ कडून तिसऱ्यांदा जिवे मारण्याची धमकी मिळाली आहे. या धमकीच्या मेलमध्ये सांगण्यात आलंय की, दहशतवादी संघटनेचे गुप्तहेर त्यांच्यावर पाळत ठेवून आहेत. या ईमेलमध्ये डीसीपी सेंट्रल श्वेता चौहान यांचा देखील उल्लेख आहे, ज्यांनी या धमकीच्या ईमेलबाबत पहिल्यांदाच मीडियामध्ये वाच्यता केली होती. या मेलमध्ये लिहलं होतं की, तुमची दिल्ली पोलिस आणि IPS श्वेता आमचं काहीही वाकडं करु शकत नाहीत. आमचे गुप्तहेर पोलिसांमध्ये देखील आहेत. आम्ही तुमच्याबाबत सर्व माहिती प्राप्त करत आहोत.
हेही वाचा: धर्म बदलला म्हणून जात बदलत नाही; मद्रास हायकोर्टाने दिला महत्त्वपूर्ण निकाल
गौतम गंभीर यांना हा ईमेल काल रात्री 1:37 वाजता मिळाला आहे. गेल्या आठवड्यातच क्रिकेटर आणि नंतर नेता बनलेल्या गंभीरने पोलिसांकडे तक्रार दाखल केली होती. त्यांना तेंव्हाही ‘ISIS काश्मीर’ मधून असल्याचा दावा करणाऱ्या व्यक्ती अथवा संघटनेकडून जीवे मारण्याची धमकी मिळाली होती. गंभीर यांच्या या तक्रारीनंतर त्यांच्या दिल्लीतील राजेंद्र नगरमधील घराबाहेर सुरक्षा प्रदान करण्यात आली होती.
हेही वाचा: महाराष्ट्रात ‘दारू’ का स्वस्त झाली ते आता समजलं : निलेश राणे
पहिल्या ईमेलमध्ये म्हटलं होतं की, आम्ही तुला आणि तुझ्या कुटुंबीयांना मारणार आहोत. त्यानंतर त्यांना दुसरा ईमेल मिळाला ज्यामध्ये लिहलं होतं की, आम्ही तुला मारु इच्छित होतो, मात्र काल तू वाचलास. जर तू तुझ्या कुटुंबीयांच्या जीवाची काळजी करतोस, तर राजकारण आणि काश्मीरच्या मुद्यांपासून दूर रहा. दुसऱ्या ईमेलमध्ये गौतम गंभीरच्या दिल्लीतील घराबाहेर शूट केला गेलेला व्हिडीओ देखील सोबत पाठवण्यात आला होता.
दिल्ली पोलिसांनी गुगलकडे संपर्क करुन या ईमेल संदर्भात माहिती मागवली होती. सूत्रांकरवी मिळालेल्या माहितीनुसार, गुगलने दिलेल्या माहितीप्रमाणे हा मेल पाकिस्तानातून पाठवण्यात आला होता.
Esakal