
महामार्गावर पहाटे चार ते सकाळी आठपर्यंत अवजड वाहतूक बंद
२९ नोव्हेंबर २०२१
पुणे : मावळ येथील साते गावाजवळ वारकऱ्यांच्या दिंडीत टेम्पो शिरून झालेल्या अपघातात चार महिला वारकऱ्यांचा मृत्यू झाल्याच्या घटना शनिवारी घडली. या अपघाताची गांभीर्याने दखल घेत ग्रामीण पोलिसांनी संत श्री ज्ञानेश्वर महाराज समाधी सोहळ्यापर्यंत जिल्ह्यातून जाणाऱ्या महामार्गांवर पहाटे चार ते सकाळी आठपर्यंत अवजड वाहनांची वाहतूक बंद ठेवण्याचे आदेश दिले आहेत.
हेही वाचा: संजय राऊतांनी दिलं ‘PM की शादी’चं आमंत्रण; लेकीची लग्नपत्रिका चर्चेत
संत ज्ञानेश्वर समाधी सोहळा मंगळवारी (३० नोव्हेंबर) होत आहे. त्यानिमित्त राज्याच्या कानाकोपऱ्यातुन श्री क्षेत्र आळंदी येथे वारकऱ्यांच्या दिंड्या येण्यास सुरुवात झाली आहे. दरम्यान मावळ येथील साते गावाजवळ शनिवारी पहाटे टेम्पोच्या धडकेत चार महिला वारकऱ्यांचा मृत्यू झाला, २४ वारकरी जखमी झाले.
हेही वाचा: दक्षिण आफ्रिकेतून डोंबिवलीत आलेला प्रवासी कोरोना पॉझिटिव्ह; महापालिका सतर्क
या दुर्घटनेनंतर संत श्री ज्ञानेश्वर महाराज समाधी सोहळ्यापर्यंत महामार्गावरील अवजड वाहतूक पहाटे चार ते सकाळी आठ वाजेपर्यंत बंद ठेवण्याचा निर्णय ग्रामीण पोलिस दलाचे अधिक्षक डाॅ. अभिनव देशमुख आणि महामार्ग पोलिस अधिक्षक संजय जाधव यांनी घेतला आहे. जुना मुंबई-पुणे महामार्ग, नाशिक, सातारा महामार्गावरील अवजड वाहतूक पहाटे चार ते सकाळी आठ वाजेपर्यंत बंद ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. राज्याच्या वेगवेगळ्या भागातून मोठ्या संख्येने वारकरी मंगळवारी येणार आहे. त्यांच्या सुरक्षेसाठी अवजड वाहतूक बंद ठेवण्याचा निर्णय घेतल्याचे डाॅ. देशमुख यांनी स्पष्ट केले.
Esakal