
२९ नोव्हेंबर २०२१
नाशिक : गेल्या काही दिवसांत परदेशातून नाशिकला परतलेल्या प्रवाशांचा शोध घेत, त्यांची चाचणी केली जाईल. त्यांच्या संपर्कात आलेल्या व्यक्तींचीही कोरोना चाचणी केली जाणार आहे. ऑमिक्रॉन व्हेरीएंटचा संभाव्य धोका लक्षात घेता, या व्हेरीएंटने प्रभावित देशांतून विमानतळाने दाखल होणाऱ्या प्रवाशांची अधिक काळजीपूर्वक तपासणी केली जाईल. ओझर विमानतळावर सक्तीने तपासणीच्या सूचना महापालिका प्रशासनाला दिल्याची माहिती जिल्हाधिकारी सूरज मांढरे यांनी रविवारी (ता.२८) दिली.
मुख्यमंत्री उद्भव ठाकरे, आरोग्य मंत्री डॉ. राजेश टोपे यांच्यासह मुख्य सचिव, व आरोग्य विभागाचे सचिव, राज्यातील विभागीय आयुक्त, जिल्हाधिकाऱ्यांची व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे बैठक रविवारी (ता.२८) झाली. यानंतर जिल्हाधिकारी मांढरे यांनी नाशिक जिल्ह्याचा आढावा घेत संबंधित यंत्रणांना सूचना केल्या. श्री. मांढरे म्हणाले, की दक्षिण आफ्रिकेत आढळलेल्या कोरोनाच्या ऑमिक्रॉन व्हेरीएंटचे संभाव्य परिणामांबाबत बैठकीत चर्चा झाली. सुरक्षिततेचा उपाय म्हणून ओझर विमानतळावर व्यवस्थित स्क्रीनिंगच्या सूचना दिल्या आहेत.
हेही वाचा: दक्षिण आफ्रिकेतून डोंबिवलीत आलेला प्रवासी कोरोना पॉझिटिव्ह; महापालिका सतर्क
परदेशात नुकताच प्रवास केलेल्या नागरिक व त्यांच्या संपर्कातील व्यक्तींवर यंत्रणा नजर ठेऊन असेल. या नव्या व्हेरीएंटमध्ये फैलाव होण्याची गती अफाट असल्याने आरोग्य यंत्रणा सज्ज ठेवण्याबाबत चर्चा झाली. त्यानुसार ऑक्सिजन, खाटांच्या उपलब्धतेचा तसेच मनुष्यबळ उपलब्धतेबाबत फेरआढावा घेणार आहे. त्याअनुषंगाने आणखी सुधारणा केल्या जातील. कोविड प्रतिबंधक लसीकरणाबाबत बैठकीत चर्चा झाली. मृत्यूदर घडविण्याच्या अनुषंगाने लसीकरणाचे प्रमाण वाढविण्यावर भर देण्याच्या सूचना यावेळी दिल्या. सद्यःस्थितीत लसीकरणाबाबत नाशिक जिल्हा चौदाव्या, पंधराव्या स्थानी आहे. आगामी काळात लसीकरणाला आणखी वेग दिला जाईल.
हेही वाचा: भिवंडीत लग्नमंडपात फटाके फोडणे भोवले; आग लागल्याने २५ दुचाकी खाक
नमुने प्रमाण वाढविणार
ओमिक्रॉन व्हायरसचा शिरकाव यापूर्वीच झाला असण्याची शक्यता नाकारता येत नाही. या पार्श्वभूमीवर आढळलेल्या कोरोना बाधितांचे जिनोम सिक्वेन्सिंगसाठी पाठविल्या जाणाऱ्या नमुन्यांची संख्या वाढविली जाईल. विशेषतः परदेशात प्रवास केलेल्या व्यक्तींची प्राधान्याने नमुने तपासणी होणार आहेत. यापूर्वी डेल्टा प्लस व्हेरीएंटची लागण करण्याची क्षमता मर्यादित होती. परंतु नव्याने आढळलेला ऑमिक्रॉन व्हेरीएंट अनेक पटींनी घातक आहे. यापूर्वीच्या व्हेरीएंटला प्रसार होण्यासाठी दहा ते पंधरा मिनीटे संपर्क कालावधी लागायचा. परंतु ऑमिक्रॉनचा प्रादुर्भावासाठी चार ते पाच मिनीटे पुरे असल्याचे मत शास्त्रज्ञांनी मांडले आहेत.
“पहिली लाट ओसरल्यानंतर नागरिक बेसावध राहिल्याने दुसऱ्या लाटेची तीव्रता वाढली होती. त्यामुळे संभाव्य तिसऱ्या लाटेबाबत गाफील राहून चालणार नाही. कोरोनाचा ऑमिक्रॉन व्हेरीएंट अधिक घातक असल्याने मास्कचा योग्य वापर, लसीकरण हेच बचावाचे उपाय आहेत. नागरिकांनी संपूर्ण सावधगिरी बाळगावी. सर्व विभागांना सतर्क राहण्याच्या सूचना दिल्या असून, परदेशातून आलेल्या व्यक्तींचे कॉन्टॅक्ट ट्रेसिंग केले जाणार आहे.”
– सूरज मांढरे, जिल्हाधिकारी.
Esakal