
एका महिलेने शहरातील एका बड्या व्यापाऱ्याचा मोबाईल क्रमांक मिळवला.
5 तासांपूर्वी
कोल्हापूर : हनी ट्रॅप प्रकरणातील संशयित सागर माने टोळीतील सहा जणांनी कट रचून आणखी एका व्यापाऱ्याकडून अडीच लाख रुपये उकळल्याची तक्रार लक्ष्मीपुरी पोलिस ठाण्यात दाखल झाली. संबंधितांनी गुन्हा दाखल करण्याची धमकी देत हे कृत्य केले. त्या सर्वांवर गुन्हा दाखल करण्यात आला. सागर माने, विजय मोरे, फारुख शेख, विजय कलकुटगी, एक महिला व तिचा भाऊ म्हणून सांगणारा तरुण अशी त्या संशयितांची नावे असल्याचे पोलिसांनी सांगितले.
पोलिसांनी दिलेली माहिती अशी, एका महिलेने शहरातील एका बड्या व्यापाऱ्याचा मोबाईल क्रमांक मिळवला. तिने व्हॉटस् ॲप चॅटिंग करून व्यापाऱ्याला भुरळ घातली. त्यांना भेटण्यासाठी बोलवून घेऊन चहा-कॉफीसाठी नेले. तिने विश्वास बसेल अशी वर्तवणूक ठेवली. तिने पुन्हा त्यांना भेटायला बोलवले. तिने लगट करण्याचा प्रयत्न केला, पण त्यांनी तिला रोखले आणि दुचाकीवरून परत जाण्यासाठी निघाले.
हेही वाचा: बँक निवडणूसाठी मुश्रीफांचे शर्तीचे प्रयत्न : 2 ‘नेत्यांना’ प्रस्ताव
दरम्यान, तिच्या साथीदारांनी त्यांना रस्त्यात अडवले. त्यांना दमदाटी करून त्याची गाडी काढून घेतली. त्यानंतर त्यांना एका लाल रंगाच्या मोटारीत जबरदस्तीने घालून नेले. त्यांना मारहाण करून बलात्काराचा गुन्हा दाखल करण्याची धमकी दिली. हे प्रकरण मिटविण्यासाठी रोख रकमेचा तगादा लावून वारंवार ५०, ६० आणि ९० हजार अशा पटीत एकूण अडीच लाखांची रक्कम खंडणी स्वरूपात उकळली. हा प्रकार ऑक्टोबर २०१९ ते मे २०२१ दरम्यान शहरभागात घडला, अशी फिर्याद संबंधित व्यापाऱ्याने दिली. याबाबत अधिक तपास पोलिस निरीक्षक अनिल गुजर यांच्या मार्गदर्शनाखाली उपनिरीक्षक विजय कोळेकर करीत आहेत.
जिल्ह्यातील सहावा प्रकार…
मुंबईपाठोपाठ आता कोल्हापूर शहरासह जिल्ह्यातील हनी ट्रॅपचे प्रकार पुढे आले आहेत. पोलिस अधीक्षक शैलेश बलकवडे यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेचे पोलिस निरीक्षक प्रमोद जाधव यांनी यशस्वी पद्धतीने तपास केला. त्यांनी हे प्रकार करणाऱ्या टोळींचा पर्दाफाश केला. आतापर्यंत याप्रकरणी जुना राजवाडा, शिरोली एमआयडीसी, शाहूपुरी, कागल, गोकुळ शिरगाव आणि लक्ष्मीपुरी पोलिस ठाण्यात गुन्हे दाखल झाले. यापैकी तीन हनी ट्रॅपमध्ये संशयित माने टोळीवर गुन्हे दाखल करण्यात आल्याचे पोलिसांनी सांगितले.
हेही वाचा: भाजप,सेनेला ‘जोर का झटका’ : 100 कार्यकर्त्यांचा राष्ट्रवादीत प्रवेश
Esakal