
5 तासांपूर्वी
नागपूर : न्यू नंदनवन येथील डॉ. देवकीबाई जीवनदास बोबडे (७८) या वृद्धेच्या हत्याकांडाचा कोणताही सुगावा अद्याप लागला नाही. त्यामुळे डॉ. देवकी यांचा खून हा सुपारी किलिंगमधून झाल्याची चर्चा जोरात आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, डॉ. देवकीबाई बोबडे यांचे न्यू नंदनवन येथे टोलेजंग घर असून तळमजल्यावर पती जीवनदास यांच्यासह राहात होत्या. पहिल्या मजल्यावर त्यांची मुलगी डॉ. किशोरी पाचभाई या पती डॉ. संजय यांच्यासह राहात होत्या. देवकी बोबडे यांची लहान मुलगी चेतना जीवतोडे ही लॅब असिस्टंट असून ती निर्मलनगरी येथे राहते. देवकीबाई यांचे पती आजारी असल्याने ते पलंगावर पडून राहतात. पतीच्या देखरेखीसाठी त्यांनी केअरटेकर ठेवला होता.
हेही वाचा: रात्री उशिरा दोघेही करीत होतो उलट्या; आईच्या लक्षात येईपर्यंत…
शनिवारी सकाळी १० च्या सुमारास डॉ. किशोरी व त्यांचे पती संजय हे दवाखान्यात निघून गेले होते. तळमजल्यावर फक्त वृद्ध दाम्पत्य होते. शनिवारी सायंकाळच्या सुमारास मारेकरी हे बोबडे यांच्या घरात शिरले. देवकीबाईने आरडाओरड करू नये म्हणून मारेकऱ्यांनी सर्वप्रथम तोंडाला चिकटपट्टी लावली. त्याचप्रमाणे तोंडात कापड कोंबला. त्यानंतर चिकटपट्टी आणि कपड्याने त्यांचे हात खुर्चीला बांधले.
ओरडण्याची संधी न देता हॉलमध्येच मारेकऱ्यांनी त्यांच्या गळ्यावर तीक्ष्ण शस्त्राने वार करून त्यांचा खून केला. सायंकाळी ६.३० च्या सुमारास डॉ. किशोरी घरी आल्या असता देवकीबाईचे दार उघडे दिसले. आत जाऊन त्यांनी पाहणी केली असता देवकीबाई रक्ताच्या थारोळ्यात पडल्या होत्या. या घटनेची माहिती पोलिसांना समजताच पोलिसांची पथके घटनास्थळी दाखल झाली.
हेही वाचा: TET प्रश्नपत्रिका हातात पडली… आणि पेपर फुटला!
चोरी झालीच नाही
चोरीच्या उद्देशाने ही घटना घडली असावी असा प्रथमदर्शनी अंदाज होता. परंतु, डॉ. किशोरी यांनी त्यांचे कपाट तपासले असता सर्व दागिने जागच्याजागी होते. मारेकऱ्यांनी घरातील एकाही वस्तूला हात लावला नव्हता. त्यावरून चोरीच्या उद्देशातून ही घटना घडली नाही, हे स्पष्ट झाले. त्यामुळे खुनाचे नेमके कारण काय, असा प्रश्न निर्माण झाला आहे. या एकंदरीत घटनेवरून कुणी जवळच्या व्यक्तीने त्यांचा घात केला असावा अशीही शंका निर्माण होत आहे.
सीसीटीव्ही फुटेज ताब्यात
देवकीबाईच्या खुनाचा छडा लावण्यासाठी नंदनवन आणि गुन्हे शाखेची पथके कामाला लागली असून त्या परिसरातील सीसी फुटेज तपासणे सुरू आहे. काही सीसीटीव्ही फुटेज पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. तसेच काही संशयितांच्या मोबाईलचा कॉल डाटा काढण्यास सुरवात केली आहे. त्यामुळे डॉ. देवकीबाई हत्याकांड लवकरच उघडकीस येण्याची शक्यता आहे.
Esakal