रत्नागिरी

मालवण; पुढारी वृत्तसेवा : अरबी समुद्रात निर्माण झालेल्या कमी दाबाच्या पट्ट्यामुळे कोकण किनारपट्टीवर वादळी वार्‍यासह पावसाने जोर धरल्याने गेली अनेक दिवस सुरू असलेल्या सागरी पर्यटनावर परिणाम झाला आहे. पर्यटनाला ‘ब्रेक’ लागल्याने पर्यटन व्यवसायिकांमध्ये चिंतेचे वातावरण निर्माण झाले आहे.

दरम्यान, खबरदारीची उपाययोजना म्हणून किल्ले सिंधुदुर्ग दर्शन प्रवासी होडी वाहतूक गुरुवारी सकाळपासून बंद ठेवण्यात आली आहे, अशी माहिती किल्ले प्रवासी होडी वाहतूक संघटना अध्यक्ष मंगेश सावंत यांनी दिली. पाऊस व वारे यामुळे मालवण किनारपट्टीवरील वॉटर स्पोर्टस् व अन्य सागरी पर्यटनही बंद ठेवण्यात आले होते. त्यामुळे मालवणात आलेल्या पर्यटकांना किनार्‍यावरूनच किल्ले दर्शन व पर्यटनाचा आनंद घ्यावा लागला.

सुरक्षेच्या उपाययोजना म्हणून छोट्या प्रवासी होड्या (नौका), मासेमारी बोटी या कोळंब खाडी पात्रात सुरक्षित स्थळी उभ्या करून ठेवण्यात आल्या आहेत. तर, मोठ्या मासेमारी नौकांनी सुरक्षित बंदरांचा आसरा घेतला आहे. अवकाळी पावसाचा मोठा परिणाम मालवणच्या सागरी पर्यटन व्यवसायावर झाला आहे.

वारे व पावसाचा मासेमारी व्यवसायावरही परिणाम झाला आहे. समुद्री वातावरण खराब आल्यामुळे मासेमारी नौका सुरक्षित बंदरात आश्रयाला आहेत. यामुळे मासेमारी व्यवसायही ठप्प झाला आहे. एकूणच मच्छीमार व पर्यटन व्यावसायिक यांचे मोठे नुकसान झाले आहे.
समुद्रात 45 ते 55 किलोमीटर वेगाने वारे वाहण्याची शक्यता आहे. तर लाटांचा जोरही वाढेल, अशी शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे. तरी प्रवासी होडी वाहतूक तसेच सागरी व खाडी पात्रातील पर्यटन व्यवसायिकांनी खबरदारी घ्यावी, असे आवाहन मालवण बंदर विभागाच्यावतीने बंदर निरीक्षण सुषमा कुमठेकर यांनी केले आहे.

पोस्ट रत्नागिरी : पावसामुळे सागरी पर्यटनाला ‘ब्रेक’ वर प्रथम दिसू लागले पुढारी.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here