सावंतवाडी, पुढारी वृत्तसेवा

रस्त्यावर गाडी पार्किंग करण्याच्या कारणावरून गोवा-पेडणे स्थानिक ग्रामस्थ तसेच सातारा येथील दहा ते पंधरा पर्यटकांमध्ये शाब्दिक बाचाबाचीनंतर दोन्ही गटात तुंबळ मारामारी झाली. या घटनेनंतर पलायन करणार्‍या सातार्‍याच्या बारा पर्यटकांना सिंधुदुर्ग जिल्ह्यातील दाणोली-बावळाट तिठ्यावर जिल्हा वाहतूक शाखेचे पोलिस, सावंतवाडी पोलिसांनी सापळा रचून पकडले. यावेळी सातारा येथील त्या पर्यटकांना गोवा पेडणे पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले. ही घटना रविवारी दुपारी 3.30 वा. पेडणे येथे घडली.

सातारा येथील पंधरा पर्यटक चार खासगी गाड्या घेऊन सहलीसाठी रविवारी गोवा येथे आले होते. दिवसभर फिरल्यानंतर ते माघारी परतत असताना पेडणे येथे रस्त्यावर गाडी पार्क करून त्यांनी मद्यप्राशन करण्यास सुरुवात केली. यावेळी स्थानिक पेडणे ग्रामस्थांनी त्यांना अडवून स्थानिक ठिकाणी मद्यप्राशन करण्यास मज्जाव केला. त्यानंतर वाहनेदेखील व्यवस्थित पार्क करण्यास सांगितले; मात्र यावरून स्थानिक ग्रामस्थ तसेच सातारा पर्यटक यांच्यात शाब्दिक बाचाबाची झाली.

त्यानंतर त्याचे पर्यावसन हाणामारीत झाले. दोन्ही गटाकडून एकमेकांना मारहाण करण्यात आली. शिवाय गाड्यांवर दगडफेक करून नुकसानही केले. यावेळी स्थानिकांना मारहाण करून पर्यटकांनी आपल्या गाड्या घेऊन तेथून पलायन केले. घटनेची माहिती पेडणे ग्रामस्थांनी पेडणे पोलिसांना दिल्यानंतर लगेच पेडणे पोलिसांनी सिंधुदुर्ग जिल्हा पोलिसांना संपर्क साधत घटनेची माहिती दिली.

याबाबत सावंतवाडी पोलिसांना कल्पना देत त्या पर्यटकांना ताब्यात घेण्याच्या सूचना केल्या. पोलिस नियंत्रण कक्षाकडून जिल्हा वाहतूक शाखेच्या पोलिसांना ही माहिती देण्यात आली. त्यावरून पलायनाच्या प्रयत्नात असलेल्या सातारा येथील त्या दहा ते पंधरा पर्यटकांच्या एका गटाला दाणोली बावळाट तिठ्यावर पोलिसांनी ताब्यात घेतले.

या कारवाईत काही पर्यटक निसटून जाण्यात यशस्वी ठरले. मात्र, बारा पर्यटकांना पकडून सावंतवाडी पोलिस ठाण्यात आणण्यात आले. हा गुन्हा पेडणे पोलिस ठाण्यात घडल्यामुळे त्याची नोंद न करता त्या सर्व पर्यटकांना पेडणे पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले. जिल्हा वाहतूक शाखेचे पोलिस व सावंतवाडी पोलिसांनी संयुक्‍तपणे ही कारवाई केली.

हेही वाचा

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here