पुढारी ऑनलाईन डेस्क

सहसा एखाद्या VIP व्यक्तीच्या गाडीचे ड्रायव्हिंग पुरूष करत असल्याचे आपण पाहतो. मात्र आज सिंधुदुर्ग जिल्ह्यात उपमुख्यमंत्री अजित पवार, गृहराज्यमंत्री सतेज पाटील आणि उच्च आणि तंत्रशिक्षण मंत्री उदय सामंत यांच्या वाहनाचे सारथ्य एका महिलेने केले. सारथ्य करणारी ही महिला पोलीस दलात कार्यरत असून तृप्ती मुळीक असे त्यांचे नाव आहे. कोल्हापूर जिल्ह्यातील अंबप पाडळी येथील त्या रहिवाशी असून, सध्या त्या सिंधुदुर्ग जिल्हा पोलीस दलात कार्यरत आहेत.

हे तिनही मंत्री आज सिंधुदुर्ग जिल्ह्याच्या दौऱ्यावर होते. तृप्ती मुळीक दहा वर्षांपासून पोलीस दलात आपली सेवा बजावत आहेत. लहानपणापासूनच त्यांना ड्रायव्हिंगची आवड आहे. त्यामुळे त्यांनी व्हीआयपी ड्रायव्हिंग कोर्समध्ये सहभाग घेतला. नुकतेच 23 डिसेंबर 2021 रोजी व्हीआयपी ड्रायव्हिंगचा कोर्स पूर्ण केला आहे. त्यानंतर आज पहिल्यांदाच त्यांनी VIP गाडीचे सारथ्य करण्याची नवी जबाबदारी पार पाडली.

नारी शक्ती! गृहराज्यमंत्री सतेज पाटील यांनी व्यक्त केल्या भावना

तृप्ती माळवी गेल्या 10 वर्षांपासून महाराष्ट्र पोलीस विभागाच्या माध्यमातून त्या सेवा देत आहेत. पण, लहानपणापासून ड्रायव्हिंगची आवड असल्याने त्या सध्या सिंधुदुर्ग मोटार पोलीस परिवहन विभागामध्ये कार्यरत आहेत. 23 डिसेंबर 2021 रोजी त्यांनी व्हीआयपी ड्रायव्हिंगचा कोर्स पूर्ण केला असून आज त्यांच्या या नव्या जबाबदारीचा पहिलाच दिवस होता. त्यांचे ड्रायव्हिंग कौशल्य वाख्याण्याजोगे असून राज्यातील तरुणींना प्रेरणा देणारे आहे. या प्रसंगामुळे माझ्या मनात माझ्या पोलीस विभागाबद्दलचा अभिमान अधिकच वाढला, त्यांना खूप साऱ्या शुभेच्छा अशा भावना गृहराज्यमंत्री सतेज पाटील यांनी व्यक्त केल्या.

राज्यात आतापर्यंत कोणत्याही महिला ड्रायव्हरने उपमुख्यमंत्री अथवा इतर मंत्र्यांच्या गाडीचे सारथ्य केल्याचे आपण पाहिलेले नाही. मात्र तृप्ती यांनी मनात कोणतीही भीती न बाळगता आपली जबाबदारी पार पाडली.

हेही वाचा

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here