
गिमवी (गुहागर) : पुढारी वृत्तसेवा
नुकतीच रत्नागिरी गॅस आणि पॉवर प्रकल्पाच्या (RGPPL) सर्व अधिकारी वर्गाने कंपनीची दयनीय अवस्था मीडिया मार्फत सर्वांसमोर मांडली. देशातील हा सर्वात मोठा वीज प्रकल्प म्हणणाऱ्या या अधिकारी वर्गाने पुढील काळात वीज खरेदीदार मिळाला नाही तर कंपनी दिवाळखोरीत जाईल अशी भीती व्यक्त केली होती.याचा परिणाम म्हणून येत्या दोन महिन्यांत स्थानिक कामगारांची काटछाट करण्याचे व खर्चावर नियंत्रण आणण्यासाठी नवा बेगडी फॉर्म्युला तयार केला. कंपनीच्या या अवस्थेमध्ये स्थानिक कर्मचाऱ्यांना नुकसानीच्या झाळा सोसाव्यात, असे मत कंपनीच्या एमडीने व्यक्त केले.
RGPPL कंपनीकडे पंचक्रोशीतील ग्रामपंचायत यांना कर देण्यासाठी निधी नाही. तर कर द्यावा लागणार नाही यासाठीचे शासनाचे लेबल लावून पळवाट काढण्याचे काम कंपनी करत आहे. मात्र दुसरीकडे याच कंपनीतील भागीदार असलेल्या इतर कंपन्यांचे अधिकारी व त्यांच्या कुटुंबाचे मनोरंजन व्हावे यासाठी लाखो रुपये खर्च करत आहे. यामध्ये नुकत्याच पार पडलेल्या क्रिकेट स्पर्धा ज्यात पंचक्रोशीतील कोणीही कामगार किंवा ग्रामस्थ नव्हता. तर कंपनीने भरवलेल्या मॅरेथॉनमध्ये कंपनीतील अधिकरी व त्यांच्या कुटुंबातील लोकांचा सहभाग फक्त होता. असे येथील स्थानिक ग्रामस्थ सांगत आहेत.
…आणि आता मात्र निमंत्रित संघाच्या कबडी स्पर्धा
या तिन्ही उपक्रमांवर कंपनीकडून लाखो रुपयांची उधळण सुरू आहे. या कंपनीच्या मिळणाऱ्या ज्या करावर अंजनवेल, वेलदुर रानवी या गावाचा विकास होत होता. तोच कर देण्यास कंपनी टाळाटाळ करत आहे. परिणामी प्रकपग्रस्त गावातील विकासच ठप्प झाला आहे. या विकास कामासाठी नियुक्ती केलेल्या कर्मचाऱ्यांच्या नोकऱ्याही गेल्या आहेत. अशी अवस्था या तिन्ही गावांची असताना या ग्रामपंचायतींना मदत करण्यासाठी कंपनीकडे निधी नाही. मात्र अधिकारी वर्ग यांची हौस-मौज करण्यासाठी क्रीडा उपकर्म अंतर्गत उधळण करत असल्याचे दिसते.
यावरून खरोखर कंपनी दिवाळखोरीत जात आहे की दिवाळखोरीत जात असल्याचे नवे सोंग सर्वांसमोर ठेवत आहे. त्यामुळे या अशा कंपनीच्या अजब कारभाराने स्थानिकांमध्ये मोठ्या प्रमाणावर असंतोष निर्माण झाला आहे.
या कंपनीच्या प्रत्येक उपक्रमाला प्रशासन आवर्जून हजेरी लावत असते. मात्र स्थानिकांनी भरलेल्या विविध कार्यक्रमांना कोरोनाचे नियम लावून परवानगी नाकारून या कंपनीतील या कार्यक्रमांना मात्र एक प्रकारे अभय देण्याचे काम प्रशासन करत असल्याचे दिसते. कंपनीकडून या प्रशासन अधिकारी यांना मिळणाऱ्या सेवेमुळे प्रशासनाची मेहेरनजर कंपनीवर दिसून येते आहे.