मुंबई / पुणे : Coronavirus in Maharashtra राज्यात कोरोनाचा पुन्हा उद्रेक होताना दिसून येत आहे. सरकारने निर्बंध लावले असले तरी त्याचे पालन होताना दिसून येत नाही. अनेक जण मास्कचा वापर सार्वजनिक ठिकाणी करताना दिसून येत नाहीत. त्यामुळे कोरोनाचा प्रादुर्भाव होताना दिसून येत आहे.  राज्यात 24 तासांत कोरोनाचे 8 हजार 67 , तर मुंबईत 5 हजार 428  नवे रुग्ण असून 454 जणांना ओमायक्रॉनची लागण झाली आहे. मात्र, धक्कादायक बाब म्हणजे राज्यात 10 मंत्री आणि 20 आमदारांना कोरोना झाल्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar) यांनी पुणे येथे सांगितले. लग्नसोहळे आणि राजकीय नेतेच कोरोनाचे सुपर स्प्रेडर ठरत आहेत.

राज्यातील कोरोनाचा  धोका वाढत आहे. (Coronavirus in Maharashtra) कोरोनाच्या बाबतीत कालच राज्य शासनाने नवीन नियमावली जाहीर केली आहे. कोरोनाचा वाढता संसर्ग लक्षात घेता नागरिकांनी नियमांचे भान ठेवले पाहिजे. लग्नसमारंभ आणि अशा प्रकारचे समारंभ मोठ्या स्वरूपात व्हावेत असे प्रत्येकाला वाटते. परंतु, कोरोनाच्या नवीन स्वरूपात आलेल्या विषाणूचा संसर्ग वेगाने होतो ही बाब लक्षात घेतली पाहिजे, असे अजित पवार यांनी सांगितले.

पाश्चात्य देशांत प्रचंड प्रमाणात बाधित रुग्ण सापडत आहेत. आपण दुसऱ्या लाटेची मोठी किंमत मोजली आहे. त्यामुळे नागरिकांच्या जीविताच्या काळजीपोटीच राज्याने नियम कठोर केले आहेत. काही राज्यांनी रात्रीची जमावबंदी, टाळेबंदी केली आहे. राज्यात मुंबई आणि पुणे येथे कोरोनाबाधितांचे प्रमाण वाढत आहे. त्यामुळे सर्व नागरिकांनी प्रशासनाला सहकार्य करावे आणि कोरोनाचा संसर्ग पसरणार नाही याची काळजी घ्यावी, असे आवाहनही  अजित पवार यांनी केले.

राज्याचे महसूल मंत्री बाळासाहेब थोरात, शालेय शिक्षण मंत्री वर्षा गायकवाड, महिला व बालकल्याण मंत्री यशोमती ठाकूर, भाजप आमदार राधाकृष्ण विखे-पाटील, हर्षवर्धन पाटील, खासदार सुप्रिया सुळे यांना कोरोनाची लागण झाली आहे.

गेल्या काही दिवसांत राजकीय नेते, आमदार हे विविध लग्नसमारंभात सहभागी होताना दिसले. या लग्नसमारंभात मोठी गर्दी झाल्याचंही दिसून आले आणि हीच गर्दी कोरोनाची सुपरस्प्रेडर ठरल्याचे दिसत आहे. जर राजकीय नेते आणि मंत्री महोदय नियमांकडे दुर्लक्ष करत असतील तर सर्वसामान्य नागरिकांकडून नियमांचे पालन कसे होणार असाही प्रश्न  उपस्थित करण्यात येत आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here