प्रफुल्ल पवार / अलिबाग : Shiv Sena News : शिवसेनेतील नाराजी पुढे आली आहे. शिवसेनेच्या नेत्यांनी वार्‍यावर सोडल्याची शिवसैनिकांची भावना आहे. यातून ही राजीनामा अस्त्र पुढे आले आहे. (Shiv Sena Activists resign) एकीकडे शिवसेनेच्या वरिष्ठ नेत्यांनी केलेले दुर्लक्ष आणि दुसरीकडे राष्ट्रवादीकडून होणारी कोंडी यामुळे श्रीवर्धनमधील शिवसैनिक  हतबल झाले आहेत. या त्रासाला वैतागून श्रीवर्धनमधील शिवसेेना पदाधिकार्‍यांनी अखेर सामूहिक राजीनामे दिले आहेत. (Shiv Sena district leader and talika leader and Activists at Shrivardhan in Raigad district Collective resignation)

सत्ता असूनही जर विकास कामे होणार नसतील तर जनतेला सामोरे कसे जाणार? असा थेट सवाल या राजीनामा दिलेल्या पदाधिकार्‍यांनी केला आहे. श्रीवर्धनमधील बोर्लीपंचतन जिल्हा परिषद गटातील शिवसेना पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांची बैठक नुकतीच बोर्लीपंचतन येथील डॉ.बाबासाहेब आंबेडकर सभागृहामध्ये आयोजित करण्यात आली होती. यावेळी जमलेल्या शिवसेना पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी आपली खदखद व्यक्त केली.

जिल्हा नियोजन मंडळाचा निधी शिवसेनेचेच तीन आमदार पळवणार असतील तर निवडणुकीत मतदारांना आम्ही तोंड कसे दाखवणार, असा प्रश्न आपल्यासमोर असल्याचे श्रीवर्धन उपतालुका प्रमुख सुकुमार तोंडलेकर यांनी म्हटले आहे. पहिल्यांदाच बोर्लीपंचतन जिल्हा परिषदेचा गड जिंकला; परंतु पक्षाने उचलून धरले नाही, अशी खंत त्यांनी व्यक्त केली.

जिल्ह्यात नियोजन मंडळामार्फत शिवसेनेच्या वाट्याला दरवर्षी निधी येतो, पाच वर्षात काहीच निधी न दिल्याने मी रायगडमधील तिन्ही आमदार, उदयोगमंत्री सुभाष देसाई, मंत्री गुलाबराव पाटील, मंत्री अब्दुल सत्तार यांचीही भेट घेतली. संपर्क प्रमुख सदानंद थरवळ यांचीही भेट घेतली; मात्र काही उपयोग झाला नाही. श्रीवर्धन मतदारसंघ हा मोडायला काढला आहे, असे दिसत आहे. तशी इच्छाच जर रायगडाच्या सर्वच प्रमुख नेत्यांची असेल तर आपल्याच्याने हे पहावणार नसल्याचे तोंडलेकर यांनी म्हटले आहे.

आमदार भरत गोगावले , आमदार महेंद्र दळवी श्रीवर्धनमध्ये लक्ष देत नाहीत. आमदार महेंद्र थोरवे श्रीवर्धनमध्ये लक्ष देत नाहीत. विकासकामे करायला गेलो तर मला दाबण्याचा प्रयत्न केला गेला आहे. माझ्यासारख्या कार्यकर्त्यांनी सतत पाठपुरावा करुनही कोणताही निधी मिळत नसल्याने तसेच वरिष्ठांनी लक्ष न दिल्याने मी उपतालुका प्रमुखपदाचा राजीनामा देत आहे, अशी घोषणा सुकूमार तोंडलेकर यांनी केली. यावेळी त्यांना अश्रु अनावर झालेत.

यानंतर आपल्या पदाचे सामूहिक राजीनामे देत असल्याचे उपजिल्हाप्रमुख श्यामकांत भोकरे यांनी या सभेमध्ये सांगितले. यासभेमध्ये अल्पसंख्यांक जिल्हाध्यक्ष मसुद दर्जी, उपतालुका प्रमुख सुकुमार तोंडलेकर, एजाज हवलदार, निखिल कांबळे, दिनेश नाक्ती,वप्रदिप मुरकर, जनार्दन गोवारी, उपविभाग प्रमुख अनिल पवार, दामोदर पाटील, याशिवाय श्रीवर्धन तालुक्यातील बोर्लीपंचतन जिल्हा परिषदेच्या गटातील शेखाडी, भरडखोल, दिवेआगर, खुजारे, कार्ले, वांजळे, कोंडेपंचतन, बोर्लीपंचतन, कापोली, शिस्ते, भावे, वडवली, वेळास, आदगांव, सर्वे, नानवेली, मणेरी, दिघी, कुडगांव, हरवीत विभागातील विभाग प्रमुख, उपविभाग प्रमुख, शाखा प्रमुख, उपशाखा प्रमुख उपस्थित होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here