
नवी दिल्ली : पुढारी वृत्तसेवा
संतोष परब हल्लाप्रकरणी केंद्रीय मंत्री नारायण राणे यांचे पुत्र आणि भाजपचे आमदार नितेश राणे यांनी सर्वोच्च न्यायालयात धाव घेतली आहे. सिंधुदुर्ग जिल्हा न्यायालय तसेच मुंबई उच्च न्यायालयाने यापूर्वी नितेश यांचा जामीनअर्ज फेटाळून लावला होता. नितेश यांनी सर्वोच्च न्यायालयात दाखल केलेल्या अटकपूर्व जामीन अर्जावर गुरुवार, २७ रोजी सुनावणी होणार आहे. ज्येष्ठ वकील मुकूल रोहतगी हे नितेश यांची बाजू मांडणार आहेत.
काही दिवसांपूर्वी मुंबई उच्च न्यायालयाने नितेश राणे यांचा अटकपूर्व जामीन अर्ज फेटाळला होता; पण त्याचवेळी अन्य आरोपी मनीष दळवी याचा अटकपूर्व जामीनअर्ज मंजूर केला होता. परब यांच्यावरील हल्ल्याप्रकरणी नितेश राणे यांचा सहभाग असल्याचे पुरावे आहेत. तसेच ही घटना पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे यांची खिल्ली उडवण्यापूर्वी घडलेली आहे. त्यामुळे राजकीय सूड म्हणून नितेश यांच्यावर गुन्हा दाखल केलेला नाही, असा दावा पोलिसांनी उच्च न्यायालयात केला होता. उच्च न्यायालयाने दोन्ही पक्षांचा युक्तिवाद ऐकल्यानंतर नितेश यांना जामीन देण्यास नकार दिला होता.
नितेश राणे यांना उच्च न्यायालयाने २७ तारखेपर्यंत अंतरिम संरक्षण दिले होते. त्यांच्या वकिलांनी सांगितल्यानुसार, आता नितेश यांनी जामिनासाठी सर्वोच्च न्यायालयात दाद मागितली आहे. सिंधुदुर्ग जिल्हा बँकेचे तत्कालीन अध्यक्ष सतीश सावंत यांचे प्रचारप्रमुख संतोष परब मारहाण प्रकरणावरून नितेश राणे हे चांगलेच गोत्यात आले आहेत. याप्रकरणाचा गवगवा झाल्यानंतर नितेश राणे अज्ञातवासात होते. १३ जानेवारीला उच्च न्यायालयाने अटकेपासून संरक्षण दिल्यानंतर त्यांनी सिंधुदुर्ग जिल्हा बँकेच्या नूतन अध्यक्षांची भेट घेतली. त्यावेळी त्यांना भेटण्यासाठी समर्थकांनी मोठी गर्दी केली होती. पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे यांची खिल्ली उडवल्याने तसेच सिंधुदुर्ग बँकेच्या निवडणुकीत सहभागी होण्यापासून रोखण्याच्या हेतूने आपल्याला लक्ष्य केले जात असल्याचा युक्तिवाद नितेश यांनी याचिकेत केला आहे.
हेही वाचलं का?