लांजा; पुढारी वृत्तसेवा

“रस्ता आमच्या हक्काचा नाही कुणाच्या बापाचा, या ठेकेदाराचे करायचे काय खाली डोके वर पाय, हम सब एक है, लांजा ग्रामस्थांच्या एकजुटीचा विजय असो, सरकारच्या गलथानपणाचा निषेध असो, लांजा बचाव” अशा जोरदार घोषणा देत लांजा गावातील समस्त मानकरी गावप्रमुख आणि हजारो लांजावासीय लांजा तालुका व्यापारी संघटनेने पुकारलेल्या आंदोलनासाठी रस्त्यावर उतरले. अखेर प्रशासनाने येत्या १० फेब्रुवारीपर्यंत शहरातील सर्व्हिस रोडचे दुतर्फा काम पूर्ण करण्याचे लेखी आश्वासन दिल्याने महामार्ग चक्काजाम आंदोलन तात्पुरते स्थगित करण्यात आले.

मुंबई-गोवा महामार्गाच्या लांजा शहरातील रखडलेल्या कामाबाबत महामार्ग प्रशासन, ठेकेदार कंपनी पर्यायाने शासनाला जाग आणण्यासाठी लांजा बचावचा नारा देत समस्त लांजावासीय गुरुवारी एकवटले. लांजातील प्रमुख मानकऱ्यांसह संपूर्ण लांजा गावामार्फत पक्षविरहित जनआंदोलन छेडण्यात आले. संपूर्ण शहरात महामार्गावर निषेध मोर्चा काढण्यात आला. या आंदोलनाला लांजातील सर्व समाज संघटना, सामाजिक संस्था, मंडळे, रिक्षा-वडाप वाहतूकदार अशा ५७ संघटनांनी दिलेल्या पाठिंब्यामुळे न भूतो न भविष्यती असे मोठे जनआंदोलन उभारण्यात आले. यामध्ये मोठ्या प्रमाणात जनता सहभागी झाल्याने लांजा बंदची हाक यशस्वी झाली. प्रशासन आणि ठेकेदार कंपनी यांनी काम पूर्ण करण्याची लेखी हमी दिल्यानंतर हे आंदोलन स्थगित करण्यात आले.

रखडलेल्या मुंबई-गोवा महामार्गाच्या कामामुळे समस्त लांजावासीय नागरिक, व्यापारी संघटना यांच्यावतीने २७ जानेवारीला चक्काजाम, रास्तारोको आंदोलनाचा इशारा देण्यात आला होता. मात्र २६ जानेवारी रोजी सायंकाळी पार पडलेल्या बैठकीत महामार्ग विभागाचे कार्यकारी अभियंता बांगर आणि ठेकेदार किरण सामंत यांनी १० फेब्रुवारीपर्यंत मुंबई गोवा महामार्गावरील लांजा शहर आणि तालुक्याच्या हद्दीतील खड्डे भरणे, पॅचवर्क ही कामे पूर्ण करून देतो, असे आश्वासन दिले होते. याबाबतचे लेखी पत्र गुरुवारी २७ जानेवारीला देतो असे सांगितले होते. त्यानुसार गुरुवारी २७ फेब्रुवारीला लांजा शहरातील प्रसन्न हॉटेल या ठिकाणी लांजातील सर्व नागरिक, व्यापारी एकत्र जमले. या ठिकाणी आपल्या समस्येबाबत श्रीफळ वाढवून गावच्या ग्रामदेवतांना गाऱ्हाणे घालण्यात येऊन संपूर्ण बाजारपेठेतून निषेध मोर्चा लांजा तहसील कार्यालयावर काढण्यात आला.

या मोर्चात लांजा तालुका व्यापारी संघटनेचे अध्यक्ष प्रसन्न शेट्ये, महम्मद रखांगी, यांच्यासह आमदार राजन साळवी, जयवंत शेट्ये, मानकरी नाना शेट्ये, कमलाकर गांधी (महाजन), सुनील कुरूप, बबन स्वामी, शिवाजी कोत्रे, प्रकाश लांजेकर, नगराध्यक्ष मनोहर बाईत, उपनगराध्यक्ष स्वरूप गुरव, जिल्हा परिषद शिक्षण सभापती चंद्रकांत मणचेकर, भाजपचे विजय कुरूप, मयू शेडे, हेमंत शेट्ये, नितीन शेट्ये, मंदार भिंगार्डे, महेश खामकर, शिवसेनेचे संदीप दळवी, जगदीश राजापकर, राजू कुरूप, गुरुप्रसाद देसाई, प्रमोद कुरूप, बाबा लांजेकर, सचिन माजळकर, पंचायत समिती सभापती मानसी आंबेकर, उपसभापती दीपाली दळवी – साळवी, जि. प. सदस्या स्वरूपा साळवी, नगरसेवक रफिक नेवरेकर, प्रसाद डोर्ले, संजय यादव, मंगेश लांजेकर, राजू हळदणकर, दुर्वा भाईशेट्ये, मधुरा लांजेकर, पूर्वा मुळे, सोनाली गुरव, लांज्यातील विविध राजकीय, सामाजिक संघटनांचे प्रतिनिधी तसेच व्यापारी आणि नागरिक मोठ्या संख्येने सहभागी झाले होते.

यावेळी लांजा एकजुटीचा विजय असो, रस्ता आमच्या हक्काचा अशाप्रकारे विविध घोषणांनी परिसर दणाणून सोडण्यात आला.
हा निषेध मोर्चा लांजा तहसील कार्यालय याठिकाणी आल्यानंतर उपस्थित लांजावासियांना महंमद रखांगी, व्यापारी संघटनेचे अध्यक्ष प्रसन्न शेट्ये, आमदार राजन साळवी यांनी संबोधित केले. यानंतर लांजा तहसीलदार प्रमोद कदम तसेच आमदार राजन साळवी यांच्या हस्ते दिनांक ३ ते १० फेब्रुवारीपर्यंत काम पूर्ण करण्याबाबतचे लेखी पत्र व्यापारी संघटनेचे अध्यक्ष प्रसन्न शेट्ये, महंमद रखांगी यांना सादर करण्यात आले. हे लेखी हमीपत्र तहसीलदार प्रमोद कदम यांनी वाचून दाखवले. या निषेध मोर्चाच्या निमित्ताने लांजा व्यापार संघटनेने संपूर्ण बाजारपेठेत कडकडीत बंद पाळला.

दिवसभर लांजा परिसर, बाजारपेठेत शुकशुकाट होता. तर मोर्चाच्या निमित्ताने चोख पोलिस बंदोबस्त ठेवण्यात आला होता. यावेळी प्रमुख मानकरी सुधाकर नाना शेट्ये, कमलाकर गांधी यांच्या हस्ते श्रीफळ वाढवून निषेध मोर्चाची सुरुवात करण्यात आली. हेमंत शेट्ये, काका शिंदे, सुनील उर्फ राजू कुरूप, विजय कुरूप, प्रमोद कुरुप, प्रकाश लांजेकर, नगराध्यक्ष मनोहर बाईत, व्यापारी संघटनेचे अध्यक्ष प्रसन्न शेट्ये, उपाध्यक्ष राहुल शिंदे, महंमदशेठ रखांगी, शिवाजी कोत्रे, जयवंत शेट्ये, भाऊ वंजारे, नाना मानकर, हेमंत शेट्ये, योगेश वाघधरे, नितिन शेट्ये, शौकत नाईक, रफिक नाईक, गफार मुजावर, कुमार बेंडखळे, मंदार भिंगार्डे, गुरुप्रसाद देसाई, स्वरूप गुरव, मिलिंद उपशेट्ये, भाऊ बेंडखळे, मोहन तोडकरी, प्रसाद भाईशेट्ये, बाबा लांजेकर, सुरु लाड आदींसह इतर तरुण वर्ग व ग्रामस्थ यावेळी मोठ्या प्रमाणात उपस्थित होते.­­­­

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here