
देवरूख, पुढारी वृत्तसेवा : संगमेश्वर तालुक्यातील पांगरी गाव पऱ्या येथे एका बालिकेला बेवारस स्थितीत सोडून गेलेल्या आईचा शोध पोलिसांनी घेतला आहे. या प्रकरणी बालिकेच्या आईसह अन्य एका तरुणाला रत्नागिरीतील कुवारबाव येथे अटक केली. पांगरी येथे 25 जानेवारी रोजी गाव पऱ्याखाली बालिका बेवारस स्थितीत सापडली होती. या प्रकरणाचा छडा लावण्यासाठी देवरुख पोलिसांनी ठिकठिकाणी पथक पाठवले. या प्रकरणाच्या मुळाशी जाण्याचा प्रयत्न केला. 3 दिवसांत या प्रकरणातील आरोपींना शोधण्यात देवरूख पोलिसांना यश आले.
गाव पऱ्याखाली बालिका बेवारस स्थितीत
पाेलिसांनी या प्रकरणी कुवारबाव बाजारपेठ येथे राहणाऱ्या मुलीच्या आईला ताब्यात घेतले. तसेच तिला मदत करणारा-यालाही ताब्यात घेण्यात आले. त्यानंतर तपासादरम्यान त्यांनी त्या बालिकेला २४ जानेवारी रोजी रात्री ११.३० वा. दरम्यान पांगरी गाव पऱ्यामधे टाकल्याची कबूली या दाेघांनी पोलीसांना दिली.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, बेवारस बालिकेच्या आईवडिलांची ओळख पटवण्यासाठी प्रसिद्धी पत्रक तयार केले. ते सोशल मीडिया तसेच वर्तमानपत्रातून प्रसिद्धी करण्यात आले हाेते. तसेच खबऱ्यांमार्फत गोपनीय माहिती देखील मिळवण्यात आली. यावेळी रत्नागिरी येथे राहणाऱ्या तिच्या आईबाबत माहिती मिळाली.
या गुन्ह्याचा तपास पोलिस अधीक्षक मोहितकुमार गर्ग, अपर पोलिस अधीक्षक जयश्री देसाई, उपविभागीय पोलिस अधिकारी निवास साळोखे, पोलिस निरीक्षक बाळकृष्ण जाधव व पोलिस निरीक्षक यु. जे. झावरे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस उपनिरीक्षक विद्या पाटील, विजय मावळणकर, सचिन भुजबळराव, संतोष सडकर, जावेद तडवी, पोलिस नाईक किशोर जोयशी, पोलिस नाईक संदीप जाधव, पोलिस शिपाई रिलेश कांबळे, पोलिस शिपाई ज्ञानेश्वर मांढरे, बापू पवार यांच्या पथकाने आरोपींचा शोध घेऊन ही कामगिरी पार पाडली.
हेही वाचलं का ?