
रत्नागिरी : दीपक कुवळेकर
संगमेश्वर तालुक्यातील पांगरी येथे सापडलेल्या त्या बालिकेला सरपंच आणि ग्रामस्थांच्या तत्परतेमुळेच जीवदान मिळाले आहे. असे असले तरी सोशल मीडियावर अनेकजण याचे क्रेडिट घेऊन प्रसिद्धी मिळवत असल्याचे दिसून येत आहे. याबाबत सर्वसामान्यांमधून नाराजी व्यक्त केली जात आहे. त्या मुलीच्या फोटो व्हायरलवरुन अनेक गंभीर असे सवाल उपस्थित होत आहेत.
गेल्या आठवड्यात पांगरी येथे निर्जन स्थळी बेवारस नवजात बालिका सापडली होती. गावचे सरपंच सुनील म्हादे यांना रविवारी सायंकाळी या वाटेने जाताना कोण तरी पक्ष्यासारखा ओरडल्याचा आवाज आला. मात्र हा आवाज लहान मुलासारखा असल्याचा भासला. हा आवाज एकदाच आला. त्यामुळे त्यांनी त्याकडे दुर्लक्ष केले. असे असले तरी रात्रभर या आवाजाने त्यांना झोप काही येईना. सकाळी उठल्यानंतर ते गावातील देवळात रंगरंगोटीचे काम सुरू होते तेथे ते गेले. यावेळी ग्रामस्थांमध्ये त्यांना कुजबुज ऐकायला मिळाली. त्या निर्जन वाटेवर कोण तरी रडतं, अशी कुजबुज ऐकायला मिळाली.
त्यांनी वेळ न घालवता लगेच 10 वाजता याठिकाणी गावकर प्रभाकर तेगडे व विजय आंबेकर यांना घेऊन घटनास्थळ गाठले. यावेळी समोर प्रकार पाहून थक्कच झाले. लगेच त्यांनी इतर ग्रामस्थांना बोलावून त्या मुलीला उचलून मुख्य रस्त्यावर आणले. यावेळी तिथे वाट न बघता तिच्यावर प्राथमिक उपचार केले. तिला तेथे बसून दूधही पाजण्यात आले. याचबरोबर रुग्णवाहिकेलाही फोन केला. मात्र दोन तास झाले तरी रुग्णवाहिका तेथे आली नाही. शेवटी गावातीलच लिंगायत यांची खासगी गाडी करून त्या मुलीला अधिक उपचारासाठी जिल्हा रुग्णालयात दाखल केले.
या सर्व प्रक्रियेत पोलिस पाटील श्वेता कांबळे, वांद्री प्राथमिक आरोग्य केंद्राचे मंगेश राऊत, सीएचचो सोनाली चव्हाण, आशा सेविका दीक्षा जाधव, दिनेश मुळ्ये, गावप्रमुख प्रभाकर तेगडे, दत्ताराम जाधव, प्रदीप म्हादये, शिवराम दुडये आदिंसह ग्रामस्थांचा यामध्ये मोलाचा वाटा होता.
या बालिकेला सरपंच तसेच ग्रामस्थांमुळे जीवदान मिळाले असले तरी सोशल मीडियावर सध्या काहीजण आपणच या मुलीला वाचवले असून, चमकूगिरी करत असल्याचे दिसून येत आहे. यावरून नाराजीही व्यक्त होत आहे.
त्या मुलीचे दैव बलवत्तर म्हणून ती वाचली त्याचबरोबर ग्रामस्थांनीसुद्धा तत्परता दाखवल्याने तिचे प्राण वाचवण्यात आम्हाला यश मिळाले.
– सुनील म्हादये
सरपंच, पांगरी.
जोडप्याची चमकूगिरी
या मुलीला जिल्हा रुग्णालयात नेल्यानंतर तिच्यावर उपचार सुरू झाले. तेथील नर्स व जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. संघमित्रा फुले यांनी बारीक लक्ष ठेवत त्या मुलीला वाचवले. असे असले तरी त्या ठिकाणी एका जोडप्याने जणू काही आपणच तिची काळजी घेत जीवदान दिले, असे सोशल मीडियावर भासवले गेले. तसे फोटोही त्यांनी व्हायरल केले. या फोटोमध्ये आमची लाडली… आमची छकुली… असा उल्लेखही केलेला जाणवला. विशेष म्हणजे हे सेल्फी फोटो काढताना या दोघांनीही मास्क देखील लावलेला नव्हता.
… तर गुन्हा दाखल होऊ शकतो?
या जोडप्याने त्या मुलीचे आपल्याबरोबर फोटो काढून सोशल मीडियावर व्हायरल केले. मुळात या जोडप्याला रुग्णालयात कसा प्रवेश दिला गेला? पोलिसांची परवानगी होती का? पोलिस तपास सुरू असताना कुठलीही बालिका असेल तर तिचा फोटो असा व्हायरल करणे गुन्हा आहे.
The post रत्नागिरी : ‘त्या’ बालिकेवरून रंगतेय चमकूगिरीचे ‘नाट्य’ appeared first on पुढारी.