राजापूर ; पुढारी वृत्‍तसेवा 

मुंबई-गोवा महामार्गावर कोंडये येथे दुचाकीचा टायर फुटून झालेल्या अपघातात दुचाकीस्वार महेश अशोक करंदीकर (वय ३० रा. राजापूर) हा जागीच ठार झाला. आज (शनिवार) सायंकाळी ३.४५ वाजण्याच्या दरम्यान हा अपघात झाला. महेश हा राजापुरातील कामाक्षी हॉटेलचे मालक अशोक करंदीकर यांचा मुलगा आहे. त्याच्या अपघाती मृत्युमुळे सर्वत्र हळहळ व्यक्त होत आहे.

या विषयी अधिक माहिती अशी की, महेश हा आपली दुचाकी घेऊन मित्र र्वैभव धर्माधिकारी याच्यासोबत राजापुरकडून सिंधुदुर्गकडे जात होता. कोंडये येथे त्याच्या दुचाकीचा टायर फुटला व हा अपघात झाला. टायर फुटल्याने वेगात असलेली दुचाकीला अपघात झाला. यावेळी महेश याच्यासह त्याचा मित्र देखील रस्त्यावर कोसळला. यात महेशला गंभीर दुखापत झाल्याने तो जागीच ठार झाला. तर सहकारी वैभव धर्माधिकारी हा किरकोळ जखमी झाला.

अपघात झाल्याचे कळताच स्थानिकांनी अपघातस्थळी धाव घेत या दोघांनाही तात्काळ राजापूर ग्रामीण रूग्णालयात दाखल केले. मात्र यातील महेश हा मृत असल्याचे वैद्यकिय अधिकाऱ्यांनी जाहीर केले. महेश याच्या अपघाती मृत्युची बातमी कळताच शहरातील व्यापारी व नागरिकांनी राजापूर ग्रामीण रूग्णालयात धाव घेतली.

महेश हा एक होतकरू तरूण होता, शहर बाजारपेठेतील कामाक्षी हॉटेलचे मालक अशोक करंदीकर यांचा तो मुलगा आहे. हे हॉटेल सांभाळण्यात तोच महत्वाची भुमिका बजावत होता. दोन वर्षापुर्वीच त्याचा विवाह झाला होता. शनिवारी तो सिंधुदुर्ग पोबुंर्ले येथील आपल्या बागेत जात असतानाच काळाने त्याच्यावर घाला घातला.

या प्रकरणी पोलीसांनी माहिती मिळताच अपघातस्थळी भेट देऊन पंचनामा केला. या प्रकरणी पोलीसांनी अपघाताची नोंद केली असून पोलीस अधिक तपास करत आहेत.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here