कुडाळ : पुढारी वृत्तसेवा

कोकणच्या दशावतारातील लोकराजा म्हणून नावलौकिक मिळविलेले सुधीर कलिंगण यांचे निधन झाले. शिवराम उर्फ सुधीर महादेव कलिंगण हे कुडाळ तालुक्यातील नेरूर शिरसोसवाडी येथील रहिवासी. ते ज्येष्ठ दशावतारी कलावंत, श्री कलेश्वर दशावतार नाट्य मंडळ नेरूरचे मालक, सांस्कृतिक संचनालय मुंबई लोककला शिफारस समितीचे सदस्य, सिंधुदुर्ग जिल्हा दशावतारी चालक मालक संघाचे सहसचिव होते. ते ५१ वर्षांचे होते. आज सोमवारी पहाटे ३ वाजण्याच्या सुमारास त्यांचे अल्पशा आजाराने निधन झाले.

गोवा येथील खासगी रुग्णालयात त्यांच्यावर उपचार सुरू होते. त्यांच्या निधनाने दशावतारी लोकलेची मोठी हानी झाली आहे.

दशावतार क्षेत्रातील प्रसिद्ध लोककलाकार महादेव उर्फ बाबी कलिगण यांचा वारसा त्यांचे सुपुत्र सुधीर कलिंगण यांनी पुढे सुरू ठेवला होता. दशावतार लोककला साता समुद्रापार नेण्यात त्यांचा वाटा होता. आतापर्यंत त्यांनी सिंधुदुर्ग, मुंबईसह महाराष्ट्र व गोवा राज्यात दशावतारी कला सादर करीत नाट्य रसिकाच्या मनावर अधिराज्य गाजवले.

दशावतारातील लोकराजा तसेच नटसम्राट म्हणून ते परिचित होते. प्रमुख राजाच्या भूमिकेसह महारथी कर्ण, राजा हरिश्चंद्र, वेडा चंदन, वृंदा जालंधर आदींसह विविध भूमिका त्यांनी साकारत रसिकांची मने जिंकली. श्रीकृष्णाचीही लक्षवेधी भूमिका साकारली होती. ट्रिकसीनयुक्त नाट्यप्रयोग सादर करीत रसिकांच्या मनात वेगळी छाप पाडली.

गेली वीस वर्ष ते श्री कलेश्वर दशावतार नाट्य मंडळ चालवत आहेत. एस. टी. महामंडळातही त्यांनी चालक म्हणून सेवा बजावली आहे. आतापर्यंत त्यांना अनेक पुरस्कार प्राप्त झाले. मुंबई ठाणे येथील महोत्सवातही त्यांनी नाट्यप्रयोग सादर केले आहेत. नामवंत सिने कलाकारांसह राजकीय नेतेमंडळींही त्यांच्यावर कौतुकाची थाप मारली होती.

सुधीर कलिंगण नेहमीच नवोदित कलाकारांना मार्गदर्शन करीत असत. त्यांच्या निधनाने कोकणच्या दशावतारी क्षेत्राची मोठी हानी झाली आहे. नेरूरसह  कुडाळ, सिंधुदुर्ग जिल्ह्यात हळहळ व्यक्त होत आहे. त्यांच्या पश्चात पत्नी, दोन मुलगे, सून व नातवंडे तसेच भाऊ, वहिनी, पुतणे व अन्य मोठा परिवार आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here