
कोल्हापूर : पुढारी वृत्तसेवा
भाजपचे आमदार नितेश राणे यांना आज गुरुवारी कोल्हापूरमधील छत्रपती प्रमिलाराजे शासकीय रुग्णालयातून (सीपीआर) डिस्चार्ज देण्यात आला. पुढील उपचारासाठी त्यांना सिंधुदुर्गातील ओरोस शासकीय इस्पितळाकडे पाठविण्यात आले. गेले चार दिवस सीपीआरच्या कार्डियाक विभागात त्यांच्यावर उपचार सुरु होते. दरम्यान, बुधवारीच त्यांना न्यायालयाने जामीन मंजूर केल्यानंतर गुरुवारी ते पुन्हा कोकणात परतले.
शिवसैनिक संतोष परब यांच्यावरील हल्ल्याप्रकरणी नितेश राणे यांना अटक झाली होती. यानंतर सीटी अँजिग्राफीसाठी त्यांना कोल्हापूरच्या सीपीआर इस्पितळात दाखल करण्यात आले होते. दोन दिवसांपुर्वी त्यांच्या रक्ताच्या चाचण्या झाल्या होत्या. दरम्यान, उलट्या आणि उच्च रक्तदाबाचा त्रास होवू लागल्याने त्यांची सीटी अँजिओग्राफी पुढे ढकल्याचा निर्णय डॉक्टरांनी घेतला होता. दरम्यान, बुधवारी दुपारी सिंधूदूर्ग सत्र न्यायालयाने राणेंचा जामीन अर्ज मंजूर केला.
मोठा पोलिस बंदोबस्त तैनात
गुरुवारी सकाळी त्यांना पोलिस बंदोबस्तात सीपीआर इस्पितळातून सिंधुदूर्ग जिल्हा रुग्णालयाकडे पाठविण्यात आले. सीपीआर आवारात मोठा पोलिस बंदोबस्त तैनात करण्यात आला होता. दहा वाजण्याच्या सुमारास सरकारी रुग्णवाहिकेतून ते फोंडा घाटमार्गे कोकणाकडे रवाना झाले. ओरस रुग्णालयात ते पुढील उपचार घेणार असल्याचे समजते.
सिंधुदुर्ग जिल्हा बँक निवडणूक रणधुमाळीत शिवसेना कार्यकर्ते संतोष परब यांच्यावर १८ डिसेंबर २०२१ रोजी कणकवलीत हल्ला झाला. त्यांच्यावर इनोव्हा कारमधून आलेल्या दोघांनी धारदार चाकूने वार केले होते. या हल्ल्यात परब जखमी झाले होते. या प्रकरणी कणकवली पोलिस ठाण्यात आ. नितेश राणे यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
या गुन्ह्यात आपल्याला अटक होवू नये यासाठी आ. राणे यांनी प्रथम जिल्हा न्यायालयात, त्यानंतर उच्च न्यायालय व सर्वोच्च नायालयात अटकपूर्व जामिनासाठी अर्ज केला होता. आ. नितेश राणे यांचा अटकपर्व जामीन अर्ज सुप्रीम कोर्टाने गुरुवार, दि. २४ जानेवारी रोजी फेटाळला होता. यावेळी सुप्रीम कोर्टाने नितेश राणे यांना जिल्हा न्यायालयात हजर होण्यास तसंच नियमित जामिनासाठी अर्ज करावा, असे निर्देश दिले होते. यासाठी कोर्टाने आ. नितेश राणे यांना १० दिवसांची मुदत दिली होती. त्यानुसार राणे यांच्या वकिलांनी न्यायालयाकडे नियमित जामिनासाठी अर्ज केला होता.