सिंधुदुर्गनगरी ः पुढारी वृत्तसेवा गेले काही वर्षे सातत्याने पाठपुरावा करूनदेखील अडचणींचा डोंगर उभा राहत असलेले व सिंधुदुर्ग जिल्हावासीयांचे स्वप्न असलेल्या सिंधुदुर्ग जिल्हा शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाला अखेर मंजुरी देण्यात आली आहे. राष्ट्रीय आयुर्विज्ञान आयोगाकडून ही अधिकृत मंजुरी देण्यात आली आहे. यामुळे गेले काही वर्षे जिल्हावासीयांचे असलेले स्वप्न अखेर साकार झाले आहे. दरम्यान, या वैद्यकीय महाविद्यालयात एमबीबीएसच्या शंभर विद्यार्थ्यांच्या बॅचला यावर्षीपासून शिक्षण घेता येणार आहे. सिंधुदुर्ग जिल्हा शासकीय वैद्यकीय महाविद्यालय पाहणीसाठी अलीकडेच पुन्हा राष्ट्रीय आयुर्विज्ञान आयोगाची समिती आली होती. या समितीने सतत दोन दिवस जिल्हा रुग्णालयात होणार्‍या या वैद्यकीय महाविद्यालयाची तपासणी केली. यानंतर काही त्रुटींची पूर्तता सहा महिन्यांत करून देण्याची हमी देण्याच्या अटीवर या महाविद्यालयाला तत्वतः मान्यता दिली होती.

मात्र, राज्य शासनाच्या वैद्यकीय शिक्षण प्रधान सचिवांनी तसे हमीपत्र दिल्याने राष्ट्रीय आयुर्विज्ञान आयोगाने सिंधुदुर्ग जिल्ह्यासाठी स्वप्न असणार्‍या या वैद्यकीय महाविद्यालयालाअखेर पूर्णतः मंजुरी दिली आहे.सिंधुदुर्ग जिल्ह्यातील आरोग्य सेवा पाहता या जिल्ह्यात शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व्हावे ही काळाची गरज होती. या जिल्ह्याला आरोग्य सेवेसाठी आत्तापर्यंत गोवा राज्यासह कोल्हापूर, मुंबई आदी शहरांकडे पहावे लागत होते. सिंधुदुर्ग जिल्ह्यातील ही स्थिती बदलायची असेल तर त्यासाठी शासकीय वैद्यकीय महाविद्यालय हे सर्वात महत्त्वाचे उत्तर होते. यासाठी जिल्ह्यात वैद्यकीय महाविद्यालय व्हावे यासाठी शासकीय वैद्यकीय महाविद्यालय कृती समितीच्या माध्यमातून 2017 पासून प्रचंड मेहनत आणि पाठपुरावा करण्यात येत होता. याला तत्कालीन वैद्यकीय शिक्षणमंत्री रवींद्र चव्हाण यांनी पाठबळ दिले.

खा. विनायक राऊत आणि आ. वैभव नाईक यांचा पाठपुरावाराज्यातील सत्ताबदल झाल्यानंतर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी सिंधुदुर्ग जिल्ह्यात झालेल्या मिनी मंत्रिमंडळ बैठकीत या वैद्यकीय महाविद्यालयाला ग्रीन सिग्नल दिला होता. त्यानंतर जिल्ह्याचे पालकमंत्री उदय सामंत, खा. विनायक राऊत व आ.वैभव नाईक यांचा याकरिताचा सातत्यपूर्ण पाठपुरावा या संपूर्ण प्रक्रियेत महत्त्वपूर्ण ठरला आहे. विशेष म्हणजे या मेडिकल कॉलेजसाठी खा. विनायक राऊत आणि आ. वैभव नाईक यांनी प्रचंड मेहनत घेतली. मध्यंतरी केंद्रीय समितीने ज्यावेळी या वैद्यकीय महाविद्यालयाची पाहणी केली होती त्यावेळी या वैद्यकीय महाविद्यालयांमध्ये काही त्रुटी काढण्यात आल्या होत्या. मात्र, त्या त्रुटींची पूर्तता केल्यानंतर केलेल्या तपासणीत हे महाविद्यालय मंजुरीस पात्र ठरले आहे. या मंजुरीचे अधिकृत आदेशही काढण्यात आले आहेत.शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाचा प्रश्न मार्गी लागल्याने जिल्हावासीयांमध्ये आनंदाचे वातावरण आहे.

हेही वाचलत का?

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here