मंडणगड ; पुढारी वृत्‍तसेवा : राष्ट्रपती रामनाथ कोविंद हे डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या मुळ गाव असणाऱ्या आंबडवे येथे अभिवादन करण्यासाठी येत आहेत. त्‍या पार्श्वभूमीवर दि 12 फेब्रुवारी 2022 रोजी मंडणगड तालुक्यातील पाच प्रमुख मार्गावरील वाहतूक सकाळी ७ ते सायंकाळी ४ वाजेपर्यंत पूर्णतः बंद करण्यात येणार असल्याचे रत्नागिरीचे पोलीस अधीक्षक डॉ. मोहित कुमार गर्ग यांनी पत्रकारांशी बोलताना सांगितले. राष्ट्रपती सकाळी साडेदहा वाजण्याच्या दरम्यान मंडणगडमध्ये दाखल होणार आहेत. या पार्श्वभूमीवर दिनांक 12 फेब्रुवारी 2022 रोजी सकाळी 7 वाजल्यापासून संध्याकाळी 4 वाजेपर्यंत या कालावधीमध्ये पुढील मार्गावरील वाहतूक बंद करण्यात आली आहे.

म्हाप्रळ चेक पोस्टकडून शेनाळे मार्गे मंडणगड शहरांमध्ये प्रवेश करणारी सर्व प्रकारची वाहतूक शेनाळे फाटा पासून बंद राहील. खेड दापोलीकडून मंडणगड शहरांमध्ये दापोली फाटा मार्गे प्रवेश करणारी सर्व प्रकारची वाहतूक कुंबळे फाट्यापर्यंत बंद राहील. बाणकोटकडून पाचरळ फाटा मार्गे मंडणगड शहराकडे येणारी वाहतूक पाचरळ फाटा पर्यंत पूर्णतः बंद करण्यात येणार आहे.

बाणकोटकडून पाचरळ फाटा म्हाप्रळ शेनाळेफाटा मार्गे जाणारी वाहतूक पूर्णपणे बंद राहील. म्हाप्रळकडून पेवे पंदेरी मार्गे बाणकोटकडे जाणारी वाहतूक पूर्णपणे बंद राहील. अशा प्रकारे पाच प्रमुख मार्गावरील वाहतूक 12 फेब्रुवारी रोजी सकाळी 7 ते संध्याकाळी 4 वाजेपर्यंतच्या कालावधीमध्ये बंद करण्यात येणार असल्याची माहिती देण्यात आली आहे. या मार्गावरून प्रवास करणार्‍या नागरिकांना पर्यायी मार्गाचा अवलंब करावा लागेल.

म्हाप्रळकडून खेड दापोली बाणकोटकडे जाणारी वाहतूक शेनाळे फाटा येथून कुंबळे मार्गे जाईल. खेड दापोली कडून महाडकडे जाणारी वाहतूक कुंबळे शेनाळे फाटा मार्गे वळविण्यात येत आहे. बाणकोटकडून मंडणगड मार्गे महाडकडे जाणारी वाहतूक देव्हारे, दापोली, कुंबळे शेनाळे फाटा मार्गे जाईल. म्हाप्रळ कडून बाणकोटकडे मंडणगड मार्गे जाणारी वाहतूक शेनाले फाटा, कुंबळे दापोली देव्हारे मार्गे बाणकोटकडे जाईल अशी व्यवस्था करण्यात आल्याचे सांगण्यात आले.

आत्तापर्यंत राष्ट्रपतींच्या येण्याच्या पार्श्वभूमीवर मंडणगड तालुकावासियांनी चांगल्या प्रकारे सहकार्य केले असून, कोणत्याही प्रकारे राष्ट्रपतींच्या दौऱ्यामध्ये अडथळा येणार नाही याची काळजी घेऊन हा दौरा यशस्वी करण्यासाठी तालुका वासियांनी आपले योगदान देण्याचे आवाहन पोलीस अधीक्षक डॉ. मोहित कुमार गर्ग यांनी केले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here