दोडामार्ग ः पुढारी वृत्तसेवा दोडामार्ग नगराध्यक्षपदासाठी भाजपकडून अर्ज दाखल केलेल्या दोन्ही उमेदवारांनी आपलेे अर्ज कायम ठेवलेे आहेत. यामुळे दोडामार्गात भाजपमध्ये बंडखोरी झाल्याचे उघड झालेे आहे. यावर आता पक्षश्रेष्ठी काय तोडगा काढणार, याची उत्सुकता आहे. दोडामार्ग न. पं. वर निर्विवाद वर्चस्व मिळूनही भाजपमधील अंतर्गत वादामुळे ही नगराध्यक्ष निवडणूक कमालीची चुरशीची बनली आहे.

दोडामार्ग नगराध्यक्ष निवड सोमवार 14 फेबु्रवारी रोजी होणार आहे. दोडामार्ग न. पं. मध्ये भाजपचे 13 व सहयोगी आरपीआयचा 1 असे 14 नगरसेवक असल्याने या ठिकाणी भाजपचा नगराध्यक्ष होणार हे उघड सत्य आहे. दरम्यान नगराध्यक्षपदासाठी भाजपचे राजेश प्रसादी व चेतन चव्हाण अशा दोघांनी उमेदवारी अर्ज दाखल केले होते. तर विरोधी शिवसेनेच्या नगरसेवकांनी अर्ज दाखल केला नाही. मागे घेण्याच्या अंतिम दिवशी यातील एक जण अर्ज मागे घेईल व नगराध्यक्ष निवड बिनविरोध होईल, असे मानलेे जात होते.

प्रत्यक्षात शुक्रवारी शेवटच्या दिवशी वरील दोन्ही उमेदवारांनी आपले अर्ज कायम ठेवल्याने या ठिकाणी भाजपमध्येच बंडखोरी झाल्याचे उघड झाले. परिणामी दोडामार्ग नगराध्यक्ष निवड भाजपांतर्गतच चुरशीची होणार आहे. सहाजिकच नक्की कोणाला मतदान करावे हा पेच उर्वरित नगरसेवकांसमोर उभा रहाणार आहे. याबाबत भाजपा गटनेता वरिष्ठांच्या आदेशाने कोणाच्या बाजूने व्हीप बजावणार? तसेच विरोधक असलेले शिवसेना व राष्ट्रवादी चे नगरसेवक काय भूमिका घेणार? याचेही औत्सुक्य आहे.

भाजपच्या दोन्ही उमेदवार हे तालुका भाजपमधील दोन गटांचे आहेत. तालुक्यातील ही गटबाजी संपविण्याचे आवाहन खुद्द केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी न. पं. निवडणुकीपूर्वी केले होते. मात्र, ही गटबाजी कायम असल्याचा प्रत्यय त्यानंतर वारंवार आला होता. या प्रकारानेही या गटबाजीवर शिक्कामोर्तब केले आहे. आता प्रत्यक्ष नगराध्यक्ष निवडीत शिवसेना व राष्ट्रवादीचे तीन नगरसेवक काय भूमिका घेणार? याला कमालीचे महत्व आले आहे.

हेही वाचलतं का?

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here