रत्नागिरी पुढारी वृत्तसेवा : रत्नागिरी मध्ये गतवर्षी मुसळधार पावसामुळे जिल्ह्यात ठिकठिकाणी आलेल्या महापुरात हजारो लोकांचे व व्यावसायिकांचे नुकसान झाले होते. या नुकसानग्रस्तांसाठी शासनाकडून 50 कोटी 76 लाख रुपयांचा निधी मदतीपोटी रत्नागिरी जिल्ह्याला प्राप्त झाला होता. त्यातील आतापर्यंत 46 कोटी 25 लाखाचे वाटप करण्यात आले आहे. जिल्ह्यामध्ये जुलै महिन्यात पडलेल्या अतिवृष्टीचा सर्वाधिक फटका चिपळूण, खेड तालुक्यांना बसला होता. वाशिष्ठी, जगबुडी नदी किनारी असलेल्या गावांमध्ये पुराचे पाणी शिरल्यामुळे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. दरडी कोसळून भातशेतीसह काही घरांचे नुकसान झाले. चिपळूण शहर दोन दिवस पाण्याखाली होती. हजारो घरे यामध्ये बाधित झाली होती.

राज्य शासनाने झालेल्या नुकसानीच्या तिप्पट मदत जाहीर केली होती. तत्काळ मदत म्हणून पाच हजार रुपये वितरीत करण्यात आले. त्यानंतर दोन महिन्यांनी शासन निर्णयाद्वारे मदतीचे निकष जाहीर केले. त्यामध्ये दुकाने, टपर्‍यांचाही मदतीत समावेश होता. या महापुरात सार्वजनिक मालमत्तांचे मोठ्याप्रमाणात नुकसान झाले होते. रत्नागिरीमध्ये मृत पावलेल्या व्यक्तींना तत्काळ मदत वाटप सुरु झाले. पंचनामे पूर्ण केल्यानंतर आवश्यक कागदपत्रांची पूर्तता केल्यानंतर संबंधितांच्या बँक खात्यामध्ये भरपाईची रक्कम वर्ग करण्यात आली.

चिपळूणमधील दुकानदारांकडून आवश्यक कागदपत्रांची मागणी करण्यात आली होती. त्याची पूर्तता करुन घेण्यात विलंब झाल्याने दुकाने, टपर्‍यांच्या मदत वाटपाला उशीर झाला. आतापर्यंत 26 कोटी 52 लाखापैकी 23 कोटी 16 लाखाचे वितरण झाले.कच्ची, पक्की घरांचे नुकसान झालेल्यामध्ये 7 कोटी 64 लाख मंजूर असून त्यातील 3 कोटी 35 लाख रुपये वाटप झाले आहेत. जिल्ह्याला प्राप्त झालेल्या निधीपैकी 46 कोटीचे वाटप झाले आहे. उर्वरित रक्कमेचे वितरण प्रशासनाकडून तत्काळ करण्यात येणार आहे.

 विभाग मदत वाटप

1) मृत, जखमी 1 कोटी 25 लाख 53 हजार
2) घरगुती वस्तू 11 कोटी 94 लाख 89 हजार
3) कच्ची, पक्की घरे 3 कोटी 35 लाख 37 हजार
4) मत्स्य विभाग 1 लाख 75 हजार
5) कारागिर 13 लाख 80 हजार
6) शेतजमिन 2 कोटी 24 लाख 11 हजार
7) शेतीपिके 1 कोटी 79 लाख 70 हजार
8) दुकान, टपरी 23 कोटी 16 लाख 83 हजार
9) मलबा उचलणे 24 लाख 58 हजार
10) निवारा केंद्र 26 लाख 25 हजार

हेही वाचलत का?

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here