
रत्नागिरी ; पुढारी वृत्तसेवा : तालुक्यातील गोळप सडा येथून गावी गेलेल्या महिलेच्या घरातील ५१ हजार रुपयांचे सोन्या-चांदीचे दागिने चोरीस गेले. याबाबत पूर्णगड पोलीस ठाण्यात घरकाम करणार्या संशयित महिलेवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याबाबत जयश्री अशोक सोहनी (५५,रा. जोशी कंपाऊंड, गोळप सडा) यांनी पूर्णगड पोलीस ठाण्यात तक्रार दिली आहे.
याबाबत मिळालेली माहिती अशी की, जयश्री या कामानिमित्त बाहेर गावी गेल्या होत्या. जयश्री यांच्या घरात घर कामासाठी दोन महिला काम करतात. वनिता रमाकांत घाणेकर (वय ५९, रा.गणेशनगर गोळप) व वैशाली संदीप घाणेकर (वय ४२, रा. गोळप ) या दोन महिला घर काम करत होत्या. जयश्री या कामानिमित्त बाहेर गेल्याचा फायदा घेत वनिता घाणेकर या महिलेने घरातील गोदरेज कपाटातील मंगळसूत्र, सोन्याची अंगठी व कानातील दोन रिंग असा एकूण ५१ हजार रुपयांचा मुद्देमाल लांबवला. या संशयावरून अधिक तपास पोलीस हवालदार ललित देवुसकर करीत आहेत.