
रत्नागिरी : पुढारी वृत्तसेवा
राज्य शासनामध्ये विलीनीकरणासाठी एसटी कर्मचार्यांचा संप अद्यापही सुरू असून रत्नागिरी आगारातील कर्मचार्यांना मंगळवारी 100 दिवस पूर्ण झाले. या संपामध्ये तब्बल 92 एसटी कर्मचार्यांचा राज्यभर मृत्यू झाला असून या सर्वांना श्रध्दांजली अर्पण करण्यासाठी रत्नागिरी विभाग नियंत्रक कार्यालयाबाहेर दुखवट्याचा शंभरावा दिवस पाळण्यात आला. यावेळी मेनबत्ती पेटवून शहीद बांधवांना श्रध्दांजली अर्पण करण्यात आली.
शासनामध्ये विलीनीकरणासाठी गेले तीन महिन्यांहून अधिक काळ एसटी कर्मचारी आपला लढा देत आहेत. राज्य शासनाच्या आश्वासनांना व माफक पगार वाढीलाही हे कर्मचारी भूलले नाहीत. एसटीच्या अनेक संघटनांनी राज्य सरकारसमोर नांगी टाकल्याने, शेवटी कर्मचार्यांनीच लढ्याचे शिवधनुष्य पेलण्यास सुरुवात केली आहे. एसटी कर्मचार्यांच्या संपामुळे जनतेला मोठा त्रास सहन करावा लागत असल्याची खंत संपात सहभागी झालेल्या कर्मचार्यांनी व्यक्त केली आहे. मात्र, आज हजर झाल्यास असा लढा पुन्हा उभा राहणे मुश्कील होणार असल्याने, कर्मचार्यांनी न्यायालयीन लढ्यासह आपला लढा सुरु ठेवला आहे.
शंभर दिवसात तब्बल 92 एसटी कर्मचार्यांचा राज्यभरात मृत्यू झाला आहे. काहींनी सरकारचे लक्ष वेधण्यासाठी आत्महत्या केल्या. काहींना शासनाच्या दबावतंत्राचा त्रास सहन न झाल्याने ह्दयविकार व अन्य आरोग्याचा प्रश्न निर्माण होऊन मृत्यू झाला आहे. आझाद मैदानापासून राज्यातील प्रत्येक आगाराबाहेर कर्मचारी आपला लढा देत आहेत.
मंगळवारी दुखवट्याच्या शंभराव्या दिवशी रत्नागिरीतील माळनाका येथे विभाग नियंत्रक कार्यालयाबाहेर श्रध्दांजली कार्यक्रम करण्यात आला. यावेळी मृत्यूमुखी पडलेल्या कर्मचारी बांधवांना मेनबत्ती पेटवून श्रध्दांजली अर्पण करण्यात आली. मोठ्या संख्येने संपात सहभागी झालेले कर्मचारी उपस्थित होते. संपाला शंभर दिवस उलटूनही एसटी कर्मचार्यांच्या प्रश्नाकडे राज्य शासनाने दुर्लक्ष केले आहे. मुख्यमंत्री विरोधकांवर टिकाटिपण्णी करीत आहेत. परंतु एसटी कर्मचार्यांच्या प्रश्नावर लक्ष द्यायला त्यांना वेळ नसल्याची खंत श्रध्दांजली कार्यक्रमात एसटी कर्मचार्यांनी व्यक्त केली.
हे ही वाचलं का