
फुणगूस : एजाज पटेल : संगमेश्वर तालुक्यातील करजुवे येथे गेल्या अनेक दिवसांपासून सुमारे 3 हजार ब्रास वाळू साठा करण्यात आला होता. त्यापैकी आता दोन हजार ब्रास वाळू अद्याप शिल्लक आहे. मात्र याकडे महसूल प्रशासन जाणूनबुजून दुर्लक्ष करत असल्याचा आरोप ग्रामस्थांकडून केला जात आहे.
जिल्ह्यात वाळू उपशाला अद्याप परवानगी मिळालेली नाही. त्यामुळे रॉयल्टी चुकवून बेकायदा वाळू विक्री होत असल्याने शासनाचा लाखो रूपयांचा महसूल बुडत आहे. वाळू साठा करण्यासाठी शासनाच्या परवानगीने बिनशेती प्लॉटमध्ये साठा करावा लागतो. याबाबतच्या कोणत्याही परवानग्या या साठ्यासाठी घेतल्या गेलेल्या नाहीत. त्यामुळे वाळू माफियांचे व महसूल प्रशासनाचे अर्थपूर्ण संबंध असल्याबाबतचा आरोप स्थानिक करीत आहेत.
घरगुती कामासाठी दीड ब्रास वाळू काढली तरी तत्परतेने कारवाई करणारा महसूल विभाग आता कारवाई का करीत नाही? असा प्रश्न स्थानिकांमधून उपस्थित केला जात आहे. करजुवे परिसरामध्ये गेल्या अनेक दिवसांपासून वाळू साठा केला गेला आहे. मात्र या जाग्यावर अद्याप तलाठी अथवा मंडल अधिकारी पोहोचलेले नाहीत. सुमारे तीन हजार ब्रास एवढा मोठा वाळू साठा खूप अंतरावरून सर्वांना दिसत आहे. मात्र महसूल विभागालाच का दिसत नाही? असा सवाल केला जात आहे.
हा साठा करणारे तालुक्यातील राजकीय पक्षाशी संबंधित असल्याने प्रशासन त्यांच्यासमोर नमते घेत असल्याचा आरोप स्थानिकांकडून केला जात आहे. मोठ्या प्रमाणात वाळूचे ट्रक जात असताना स्थानिक पोलिसही याकडे दुर्लक्ष करत असल्याची चर्चा सुरू आहे.