खेड : पुढारी वृत्तसेवा 

तालुक्यातील लोटे औद्योगिक वसाहतीतील एका कंपनीच्या जागेचा भराव करण्यासाठी स्थानिक ठेकेदाराने लगतच असलेल्या लोटे-भेंडेवाडी रस्त्यानजीक च्या डोंगरभागात मोठ्या प्रमाणात मातीचे उत्खनन करण्यास सुरुवात केली आहे. हे उत्खनन गेले आठ – दहा दिवस सुरू आहे. डोंगर भागातील मातीच्या उत्खननामुळे पावसाळ्यात जवळच असलेल्या घरांना धोका होण्याची दाट शक्यता आहे.

या उत्खननासंदर्भात महसूल विभागाकडे चौकशी केली असता सुरुवातीपासून फक्त दोनशे ब्रास माती उत्खननाचे स्वामित्वधन संबंधित ठेकेदाराने महसूल विभागाकडे भरणा केले आहे, अशी माहिती प्राप्त झाली आहे; परंतु या ठेकेदाराने आतापर्यंत या ठिकाणी सुमारे सातशे – आठशे ब्रास मातीचे उत्खनन केले आहे. या संदर्भात काही स्थानिक ग्रामस्थांनी महसूल विभागाकडे या उत्खनना संदर्भात माहिती विचारल्यानंतर तलाठी कार्यालयाकडून ही माहिती मिळाली आहे; परंतु यापूर्वी तुटपुंजे स्वामित्वधन जमा करून त्यापोटी पाच पट मातीचे उत्खनन करून महसूल विभागाची फसवणूक करणार्‍या ठेकेदारावर दंडात्मक कारवाई केव्हा होणार? असा प्रश्न सर्वसामान्यातून विचारला जात आहे.

घरकुलाच्या घर बांधणी साठी एखादा नदीलगतच्या भागातून एक-दोन ब्रास वाळूचे उत्खनन करणार्‍या ग्रामस्थांसंदर्भात एखादी तक्रार झाल्यास महसूल विभागाकडून त्याच्यावर तत्काळ कारवाई करण्यात येते; पण शासनाची दिशाभूल करून स्थानिक असल्याचा गैरफायदा घेत तुटपुंज्या भरलेल्या स्वामित्वधनाच्या अधिक पट माती उत्खनन करणार्‍या या ठेकेदारावर अद्यापही का कारवाई झाली नाही, असा प्रश्‍न सर्वसामान्यांमधून विचारला जात आहे. या संदर्भात स्थानिक तलाठी आणि मंडल अधिकारी यांनी शासनाचे स्वामित्वधन भरा आणि मग काम सुरू करा, असे संबंधित ठेकेदाराला सुनावल्यानंतर चार दिवस काम बंद ठेवून दोन दिवस रात्रीच्या अंधारात ठेकेदाराने भरावाचे काम सुरू केले होते. तर गेले दोन – तीन दिवस-रात्र मातीच्या भरावाचे काम सुरू आहे. परंतु, अद्यापही या ठेकेदाराने महसूलकडे नाममात्र दोनशे ब्रासचे स्वामित्वधन जमा करून हे काम सुरूच ठेवले आहे. महसूल खात्याकडे नाममात्र स्वामित्वधन भरून वारेमाप उत्खनन करण्याची शक्कल लढवून ठेकेदाराने महसूल विभागाला लाखोंचा चुना लावल्याचे दिसते.

याप्रकरणी कारवाईचे आदेश : घोरपडे 

या संदर्भात येथील तहसीलदार प्राजक्‍ता घोरपडे यांच्याशी संपर्क साधला असता त्यांनी, मी या प्रकरणी तत्काळ कारवाईचे आदेश दिले असून, संबंधित जागेवर मोजमापे घेऊन दंडात्मक कारवाई करण्यात येईल, असे सांगितले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here